काम ठप्प, कॉन्ट्रॅक्टर गप्प – नागरिक मात्र खडीत अडकले!
MK NEWS 36/ संपादकीय
📰 बारामतीच्या विकासाला ब्रेक : सातव चौक-तांदळवाडी रस्ता काम अर्धवट, खडीवरून वाहतुकीला धोका
BARAMATI:बारामतीतील टीसी कॉलेज पाठीमागील सातव चौक परिसर आणि सातव चौक ते तांदळवाडी रस्ता यावरील काम गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाले आहे. अर्धवट टाकलेली खडी, उघडी पडलेली पृष्ठभाग व त्यावरून मोठ्या वाहनांचे जाणे, या सर्वामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काम ठप्प होण्यामागे हायवा टिपर चालक-मालक संघटनेने पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसत असून, यामुळे साहित्य पुरवठा थांबल्याचे बोलले जात आहे. मात्र, या स्थितीत कॉन्ट्रॅक्टरने सुरक्षा बॅरिकेड्स लावून वाहतूक थांबवण्याची जबाबदारी पार पाडली नाही. फक्त एक-दोन बोर्ड लावण्यापलीकडे कोणतीही दक्षता घेतली नसल्याने, नागरिकांना अजूनही त्या रस्त्यावरून जाण्याची परवानगी मिळत आहे.

परिस्थिती धोकादायक बनली असून, दुचाकी व पादचाऱ्यांना अपघात होण्याची शक्यता प्रचंड आहे. खडी उडून डोळ्यांना व शरीराला दुखापत होण्याचे प्रकार कधीही घडू शकतात. त्यामुळे नगरपालिका, पोलिस व संबंधित विभागांनी तातडीने हस्तक्षेप करून रस्ता सुरक्षित करावा अशी जोरदार मागणी होत आहे.



