“दौंड पत्रकार विरुद्ध पोलीस निरीक्षक वाद पेटला; विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून चौकशीचे आश्वासन”
🔥MK NEWS36
दौंड शहर व तालुक्यातील पत्रकारांची कोल्हापूर आयजी कार्यालयात धाव; चौकशीचे आश्वासन
पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्याविरोधातील तक्रारीची विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून गांभीर्याने दखल
दौंड | प्रतिनिधी : प्रकाश सोनवणे
दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि दौंड शहर व तालुक्यातील पत्रकारांमध्ये निर्माण झालेला वाद आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचला आहे. पत्रकारांनी थेट कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या कार्यालयात धाव घेत शेडगे यांच्या कथित अशोभनीय व धमकीवजा वक्तव्यांबाबत निवेदन साद केले. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिल्याचे पत्रकारांनी सांगितले.
दि. १३ ऑगस्ट रोजी दौंड पोलीस ठाण्यात रोहित्र चोरी प्रकरणातील अटक आरोपींची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, दुपारी १२.४५ वाजता व्हॉट्सॲपद्वारे दुपारी १.३० वाजता पत्रकार परिषद असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार पत्रकार पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र आरोपींना लॉकअपमधून बाहेर आणण्यास झालेला विलंब तसेच प्रेस नोट उपलब्ध नसल्याने पत्रकार परिषदेला उशीर झाला.
यावेळी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी उपस्थित पत्रकारांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान ज्येष्ठ पत्रकार उमेश कुलकर्णी यांनी विवेक गटने आत्महत्या प्रकरणातील आरोपींची अटक तसेच एका तरुणीच्या अपहरण प्रकरणात सुरुवातीला मिसिंगची नोंद होऊन त्यानंतर अपहरणाची तक्रार दाखल झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केल्याचे पत्रकारांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रश्नांवरून पोलीस निरीक्षक शेडगे यांनी कथित खोचक व धमकीवजा वक्तव्ये केल्याचा आरोप पत्रकारांनी केला आहे. ‘तुमच्याविषयी आमच्याकडे बरीच माहिती आहे’, ‘उगाच काड्या का करता?’ तसेच ‘इथल्या प्रत्येकाची माहिती आमच्याकडे आहे’ अशा स्वरूपाची वक्तव्ये झाल्याचा दावा पत्रकारांनी निवेदनातून केला आहे.
या प्रकारामुळे पत्रकारांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगत उपस्थित पत्रकारांनी पत्रकार परिषदेतून बाहेर पडत परिषदेवर बहिष्कार टाकला. त्यानंतर दौंड शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांची बैठक घेण्यात आली. बैठकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापूर आयजी कार्यालयात निवेदन
दि. १७ ऑगस्ट रोजी दौंड तालुक्यातील पत्रकारांनी कोल्हापूर येथे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन साद केले. संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्रकारांनी केली. यावर प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे पत्रकारांनी सांगितले.
सीसीटीव्ही, ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासण्याची मागणी
या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान पत्रकार, पोलीस कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवावेत. तसेच पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज, उपलब्ध ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग, व्हॉट्सॲप संदेश, स्टेशन डायरी आणि पत्रकार परिषदेची नोंद सुरक्षित ठेवून ती चौकशीचा भाग करण्यात यावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.
आरोप चौकशीत सिद्ध झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर सेवा नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. तसेच चौकशीच्या काळात पत्रकारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा सूडबुद्धीने कारवाई होऊ नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.
विविध प्रकरणांच्या चौकशीची मागणी
विवेक गटने आत्महत्या प्रकरण, तरुणीच्या अपहरण प्रकरणातील तपास तसेच वायरलेस फाटा परिसरातील लॉजवरील कारवाईची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका-जुगार, पत्त्यांचे क्लब, वेश्याव्यवसाय आणि गावठी दारूचे अड्डे याबाबतही चौकशी करून संबंधित बीट अंमलदारांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.
पत्रकारांना अधिकृत माहिती वेळेत मिळावी
पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची अधिकृत माहिती पत्रकारांना वेळेवर उपलब्ध व्हावी, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. पत्रकारांना अधिकृत माहिती देताना ठाणे पातळीवर अडथळे निर्माण होऊ नयेत, अशी भूमिकाही पत्रकारांनी मांडली.
तसेच दौंड येथील अॅक्सिस बँक शाखेत आढळलेल्या कथित बनावट चलनी नोटांच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
‘तक्रार वैयक्तिक द्वेषातून नाही’
ही तक्रार कोणत्याही वैयक्तिक द्वेषातून करण्यात आलेली नसून पत्रकारांना निर्भयपणे प्रश्न विचारता यावेत, पोलीस आणि प्रसारमाध्यमांमध्ये सन्मानपूर्वक संवाद राहावा आणि गंभीर तसेच प्रलंबित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी व्हावी, या उद्देशाने करण्यात आल्याचे पत्रकारांनी स्पष्ट केले.
विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या चौकशीच्या आश्वासनामुळे आता या प्रकरणाकडे दौंड शहर व तालुक्यातील पत्रकारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. चौकशीत नेमके काय निष्पन्न होते आणि त्यानंतर कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
— प्रकाश सोनवणे, प्रतिनिधी




