“अभिनयापासून चित्रपट निर्मितीपर्यंत प्रशिक्षणाची संधी; टी.सी. महाविद्यालयाचा योद्धा प्रॉडक्शनसोबत करार”
🔥MK NEWS36
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळणार नवे व्यासपीठ
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय व योद्धा प्रॉडक्शनमध्ये सामंजस्य करार
बारामती : अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती आणि योद्धा प्रॉडक्शन, बारामती यांच्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच कला व सांस्कृतिक क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) नुकताच संपन्न झाला.

या करारामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभिनय, नाट्य, लघुपट व चित्रपट निर्मिती, नाट्यदिग्दर्शन, लेखन, नृत्य, संगीत यांसह विविध कला क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार आहे. कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे, सांस्कृतिक उपक्रम, ऑडिशन तसेच प्रत्यक्ष प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार असून, महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
शिक्षणासोबतच कला व मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मोठी चालना मिळू शकते. या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी तसेच भविष्यातील करिअरच्या नव्या संधी शोधण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, योद्धा प्रॉडक्शनचे संचालक श्री. योगेश नालंदे व श्री. नानासाहेब साळवे, उपप्राचार्य डॉ. योगिनी मुळे, डॉ. अरुण मगर, मराठी विभाग प्रमुख व कला शाखेच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. सीमा नाईक-गोसावी तसेच मराठी विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक उपस्थित होते.




