ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

“गणेश आगमनाचे वेध; आकर्षक मूर्तींनी सजली बाजारपेठ, होलसेलसह किरकोळ विक्री सुरू”


🔥MK NEWS36 

गणेशमूर्तींच्या निर्मितीला वेग; सहा इंचांपासून तब्बल १५ फुटांपर्यंत मूर्ती उपलब्ध

होलसेलसह किरकोळ विक्रीची सुविधा; मूर्तिकार व कारागिरांची अहोरात्र लगबग

प्रतिनिधी | सागर समिंदर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींच्या निर्मिती व विक्रीला वेग आला असून, गणेश आगमनाच्या तयारीसाठी मूर्तिकार आणि कारागीर अहोरात्र मेहनत घेताना दिसत आहेत. १४ सप्टेंबर २०२६ पासून गणेश आगमनाला सुरुवात होत असल्याने गणेशमूर्तींच्या बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदा गणेशमूर्तींच्या विविध आकार, आकर्षक रंगसंगती आणि कलात्मक स्वरूपांना विशेष पसंती मिळत आहे. घरगुती गणपतींसाठी सहा इंचांपासून लहान आकाराच्या मूर्ती, तर सार्वजनिक गणेश मंडळांसाठी तब्बल १५ फुटांपर्यंतच्या भव्य मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार विविध प्रकारच्या गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत.

मूर्तींची होलसेल तसेच किरकोळ विक्री सुरू असून, गणेशभक्तांकडून आपल्या पसंतीच्या मूर्तींसाठी आगाऊ विचारणा केली जात आहे. पीओपीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्तींवर आकर्षक रंगकाम, नक्षीकाम आणि विविध प्रकारची सजावट करण्यात येत आहे. मूर्तींना अंतिम स्वरूप देण्यासाठी रंगकाम करणारे कलाकार आणि कारागीर दिवस-रात्र कार्यरत आहेत.

मूर्ती तयार करणे, त्यावर बारकाईने रंगकाम करणे, आकर्षक सजावट करणे तसेच वाहतुकीदरम्यान मूर्तींचे नुकसान होऊ नये यासाठी सुरक्षित पॅकिंग करणे, या प्रत्येक टप्प्यावर कारागिरांची मोठी लगबग सुरू आहे. गणेश आगमनापूर्वी सर्व ऑर्डर वेळेत पूर्ण करण्यासाठी मूर्तिकारांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे तसतशी गणेशमूर्तींच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. गणरायाच्या स्वागतासाठी मूर्तिकारांची लगबग आणि गणेशभक्तांचा उत्साह यामुळे बाजारपेठेत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. आगामी दिवसांत गणेशमूर्तींच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा मूर्तिकार व विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.


Translate »
error: Content is protected !!