“आई-वडिलांनी रागावल्यानंतर घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा इमारतीवरून पडून मृत्यू; बारामतीत खळबळ”
🔥MK NEWS36
“आई-वडिलांनी रागावल्याने घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा इमारतीवरून पडून मृत्यू; बारामतीत हळहळ”
बारामती | प्रतिनिधी
आई-वडिलांनी रागावल्याने घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा बारामती तालुक्यातील रुई परिसरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात सदर मुलीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील टेरेसवरून उडी घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याची माहिती बारामती तालुका पोलिसांनी दिली आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास मुलीला तिच्या आई-वडिलांनी रागावले होते. त्यानंतर ती रागाच्या भरात घरातून निघून गेली. कुटुंबीयांनी तिचा आजूबाजूच्या परिसरात बराच वेळ शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. त्यामुळे 23 ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे 3.40 वाजता कुटुंबीय बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाले.

नाईट राउंड अधिकारी पोहेकॉ बापू कांबळे यांनी मुलीच्या वडिलांसोबत परिसरात शोध घेतला. मात्र मुलीचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सकाळी 6.32 वाजता गुन्हा रजि. नं. 401/2026, कलम 137(2) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, शोधमोहीम सुरू असतानाच डायल 112 चे पोहेकॉ कृष्णा कांबळे यांना रुई हद्दीतील स्वामी समर्थ बिल्डिंगच्या बाजूला एक मुलगी मृतावस्थेत पडल्याची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांना बोलावून खातरजमा केली असता, तीच बेपत्ता झालेली मुलगी असल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक टीम तसेच डिटेक्शन ब्रांचच्या तीन पथकांना घटनास्थळी पाचारण करून तपास सुरू करण्यात आला.
पोलिसांनी स्वामी समर्थ रेसिडेन्सीच्या पाचव्या मजल्यावरील टेरेसची पाहणी केली असता टेरेसचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे आढळले. स्थानिक मुलांच्या मदतीने शिडीच्या सहाय्याने पोलिसांनी टेरेसवर प्रवेश केला. तेथे मयत मुलीची चप्पल आढळून आली.
तसेच इमारतीतील लिफ्टजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, मुलगी रात्री 9.58 वाजता लिफ्टने वरच्या दिशेने गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. घटनास्थळी तिच्या शरीरावर तोंडावर खरचटल्याच्या जखमा आढळून आल्या असून डावा हात व डावा पाय फ्रॅक्चर झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले. ती पालथ्या अवस्थेत आढळली.
घटनास्थळावरील परिस्थिती, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे मुलीने इमारतीवरून उडी घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थिती स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.
दरम्यान, या घटनेने पालक आणि समाजासमोर मुलांच्या भावनिक अवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. मुलांच्या चुकीवर पालकांनी त्यांना समज देणे आवश्यक असले, तरी राग, तणाव किंवा कौटुंबिक वादाच्या प्रसंगी मुलांशी संवाद साधणे आणि त्यांच्या मनातील भावना समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. एखाद्या क्षणिक भावनेतून मुलाने टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी पालक, शिक्षक आणि समाजाने मुलांशी अधिक संवेदनशीलपणे संवाद साधण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.
या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम व पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत करीत आहेत.




