“मटक्याचा धुमाकूळ की पोलिसांचा ‘आशीर्वाद’? दौंड शहरातील चर्चेने उपस्थित केले गंभीर प्रश्न”!
🔥MK NEWS36
दौंड शहरात गल्लीबोळात मटक्याचा धुमाकूळ?
पोलिसांच्या कथित ‘आशीर्वादाची’ दबक्या आवाजात चर्चा; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
दौंड | प्रतिनिधी प्रकाश सोनवणे
दौंड शहरातील विविध गल्लीबोळांमध्ये मटका व्यवसाय पुन्हा सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू असून, शहरातील काही भागांत मटका घेणारे अड्डे सुरू असल्याचे बोलले जात आहे. या कथित अवैध व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, एका पोलिस कर्मचाऱ्याच्या कथित पाठबळामुळे मटका व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. मात्र, या आरोपांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे या चर्चेची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी निष्पक्षपणे पडताळणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मटका व जुगाराच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता असते. विशेषतः तरुण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रकारच्या अवैध जुगाराच्या आहारी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहरातील कथित मटका अड्ड्यांवर पोलिस प्रशासनाने प्रभावी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरातील नेमके कोणत्या भागात मटका सुरू आहे? या व्यवसायामागे कोण आहेत? त्यांना आर्थिक अथवा अन्य प्रकारचे पाठबळ कोणाचे आहे? तसेच पोलिस यंत्रणेतील कोणाचा कथित सहभाग आहे का? या प्रश्नांची उत्तरे आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या चौकशीतून समोर येणे अपेक्षित आहे.
दरम्यान, मटका व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांचा कोणताही सहभाग किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांची स्वतंत्र चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
💢चर्चा खरी की अफवा?
दौंड शहरातील मटका व्यवसायाबाबत सुरू असलेल्या चर्चेची वरिष्ठ पोलिस अधिकारी कितपत दखल घेतात, कथित मटका अड्ड्यांवर कारवाई होते का आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित सहभागाबाबत चौकशी केली जाते का, याकडे आता दौंडकरांचे लक्ष लागले आहे.




