ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

बारामतीत चोरीची मोठी घटना; प्रिझ्मा आय केअरमधून १५ लाखांची रोकड गायब..!


🔥MK NEWS36 

भिगवण रोडवरील ‘प्रिझ्मा आय केअर’ हॉस्पिटलमध्ये १५ लाखांची धाडसी चोरी

बारामती : शहरातील भिगवण रोडवरील संगवी टाऊनशिप परिसरातील प्रिझ्मा आय केअर हॉस्पिटलमध्ये अज्ञात चोरट्याने पहाटेच्या सुमारास प्रवेश करून तब्बल १५ लाख रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची धाडसी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १३ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.२० वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने हॉस्पिटलच्या मुख्य दरवाजाजवळील ग्रॅनाईट चौकट तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर हॉस्पिटलमधील ड्रॉवर उचकटून त्यामध्ये ठेवलेली अंदाजे १५ लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ९७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३) व ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील CCTV फुटेज तपासणे, तांत्रिक तपास तसेच विशेष पथकाद्वारे शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलीस स्टेशनकडून नागरिक, व्यापारी, हॉस्पिटल व क्लिनिक चालक तसेच दुकानदारांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम दुकान किंवा कार्यालयात ठेवू नये, परिसरात सक्षम CCTV कॅमेरे बसवून ते कार्यरत ठेवावेत, सुरक्षित लॉकिंग सिस्टीम व अलार्म सिस्टीमचा वापर करावा, तसेच रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षकाची व्यवस्था करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

तसेच परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशन किंवा आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षकांनी नागरिकांना केले आहे.


Translate »
error: Content is protected !!