युवांना संधी देण्याची घोषणा फसवी; अजित पवार गटाची यादी आली तर ‘जुनेच’ चेहरे पुन्हा अग्रस्थानी!
🔥MK NEWS36
बारामती नगरपरिषद निवडणुकीत अंतिम टप्प्याला आलेली चुरस आता क्षीण; उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आशा-निराशेची भावना..!
(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)
बारामती │ नगरपरिषद निवडणुकीची रंगत आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून काल जाहीर झालेल्या उमेदवार यादीनंतर संपूर्ण शहरात राजकीय चर्चा चांगलीच तापल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यादीत नवीन काहीही पाहायला मिळाले नाही. चार-पाच नवीन चेहरे वगळता बहुतेक वॉर्डांमध्ये जुन्या नगरसेवकांच्या पत्नी, कुटुंबीयांनाच संधी देण्यात आली आहे. त्यामुळे “खऱ्या अर्थाने नव्यांना व तळागाळात काम करणाऱ्यांना संधी कुठे?” असा सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार गट) ची यादी — जुनेच चेहरे, घराणेशाहीची पुनरावृत्ती..!
गेल्या काही दिवसांपासून ‘नवीन चेहरे, तळागाळातील कार्यकर्त्यांना प्राधान्य’ अशा घोषणा दिल्यानंतरही यादी पाहता केवळ घरच्यांनाच संधी मिळाल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. काही उमेदवार तर थेट माजी नगरसेवकांचे किंवा पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची कुजबुज सुरू आहे.
तळागाळात काम करणाऱ्यांना “डिस्चार्ज” मिळाल्याची भावना मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली जात आहे.
शरद पवार गटाचा ‘नोरा-कुस्ती’ पॅटर्न कायम..!
राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेही अतिशय मर्यादित पद्धतीने, जणू लढायचेही आणि न लढायचेही, अशा धाटणीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या गटाकडून फारशी आक्रमक निवडणूक होईल असे दिसत नाही. स्थानिक राजकारणात याची चर्चा—
“निवडणूक लढवायची पण पूर्ण ताकद लावायची नाही” — अशी रंगतदार पद्धतीने सुरू आहे.
भाजपची अडचण — काही प्रभागात उमेदवारच नाही
दुसरीकडे भाजपची परिस्थिती आणखी कठीण झाली आहे. काही प्रभागांत तर पक्षाला उमेदवारच उपलब्ध झाले नाहीत. यामुळे स्थानिक संघटनात्मक मजबुतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, कार्यकर्त्यांमध्येही याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
निवडणूक एकतर्फी होणार?
सध्याच्या उमेदवार याद्या पाहता अनेक वॉर्डांमध्ये मुकाबला एकतर्फी होण्याची शक्यता प्रबळ आहे. काही ठिकाणी चुरस होऊ शकते, मात्र तीही अत्यंत मर्यादित असेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.
अजित पवारांचा प्रभाव — सरकारी सत्तेचा लाभ?
उमेदवारी निश्चिती प्रक्रियेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रभावाचा स्पष्ट वापर झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. शहरातील नागरिकांना थेट पदाधिकार्यांकडून बोलावून घेतले गेले, बैठका घेतल्या गेल्या आणि त्यातून यादी अंतिम केली गेली, अशी माहितीही समोर येत आहे.
एकूणच, बारामतीतली ही नगरपरिषद निवडणूक नाट्यमय असली तरी स्पर्धा मात्र फिकी पडलेली दिसत आहे.
तळागाळात काम करणाऱ्यांना नावे देता आली नाहीत, तर घराणेशाहीला मात्र उघडपणे प्राधान्य देण्यात आले— अशी भावना शहरभर व्यक्त होताना दिसते.




