जगदाळे कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार..!
🔥MK NEWS36
माजी आमदार उषादेवी जगदाळे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली
लोकाभिमुख आणि स्नेहशील नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त
पुणे, दि. 14 मे : दौंड तालुक्याच्या माजी आमदार उषादेवी कृष्णराव जगदाळे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त करत, त्यांच्या जाण्याने पुणे जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक स्नेहशील व लोकाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, “माँ” म्हणून सर्वपरिचित असलेल्या उषादेवी जगदाळे यांनी दोन वेळा आमदार म्हणून दौंड तालुक्याचे प्रतिनिधित्व करत जनतेची निष्ठेने सेवा केली. त्यांचे पती कृष्णराव उर्फ बाळासाहेब जगदाळे यांनीही तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले होते.
जगदाळे कुटुंबाचा सामाजिक व राजकीय वारसा त्यांचे सुपुत्र वीरधवल जगदाळे समर्थपणे पुढे नेत असल्याचेही त्यांनी नमूद केले. जगदाळे पाटील कुटुंब हे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे घराणे म्हणून ओळखले जाते, असेही त्यांनी म्हटले आहे.
जनतेशी असलेली आत्मीयता, साधेपणा आणि समाजासाठीची त्यांची बांधिलकी कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री पवार यांनी श्रद्धांजली वाहिली. पवार आणि जगदाळे कुटुंबांमध्ये अनेक दशकांपासून जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सांगत, उषादेवी जगदाळे यांच्या निधनाने ही केवळ जगदाळे कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्राची मोठी हानी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जगदाळे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून, परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली.




