केडगावात मध्यरात्री थरार! इलेक्ट्रिक दुकानाला आग लावून ४० लाखांचे नुकसान..!
🔥MK NEWS36
केडगाव-चौफुला रस्त्यावरील इलेक्ट्रिक दुकान अज्ञातांकडून आगीत भस्मसात
दोन वेळा चोरीनंतर आता थेट आग लावून लाखोंचे नुकसान; परिसरात खळबळ
चीफ ब्युरो : चंद्रकांत आहेरकर
केडगाव (विशेष प्रतिनिधी)
केडगाव-चौफुला रस्त्यावरील “मोरया इलेक्ट्रिकल्स अँड सर्व्हिसेस” या इलेक्ट्रिक दुकानाला बुधवारी (दि. १३ मे) पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा कापून आत प्रवेश करत नुकसान करण्याच्या उद्देशाने ही आग लावण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या भीषण आगीत प्रो. प्रा. श्री. तुषार कोंडे यांचे अंदाजे ४० लाख रुपयांचे इलेक्ट्रिकल साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले.

दरम्यान, यवत पोलीस स्टेशनची पेट्रोलिंग गाडी घटनास्थळावरून जात असताना दुकानातून धूर येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ थांबून दुकान मालक व संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला तसेच दौंड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत परिसरातील सजग नागरिकांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आग मोठ्या प्रमाणात भडकलेली असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. अखेर अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून नष्ट झाले होते.
या घटनेत कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही तत्परता दाखवत परिसरातील वीजपुरवठा तातडीने खंडित केला.
घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी अशा नीच प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. अज्ञात आरोपीविरोधात यवत पोलीस स्टेशन अंतर्गत केडगाव आऊट पोस्ट येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.
विशेष म्हणजे, याच दुकानात यापूर्वी दोन वेळा मागील बाजूने पत्रे तोडून चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे ही आग पूर्ववैमनस्यातून, व्यावसायिक स्पर्धेतून की अन्य कोणत्या कारणातून लावण्यात आली, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. चोरीचा उद्देश असता तर साहित्य चोरले गेले असते; मात्र थेट आग लावून मोठे आर्थिक नुकसान करण्यामागे नेमका हेतू काय, याचा उलगडा तपासानंतरच होणार आहे.
कोंडे कुटुंबियांचे झालेले मोठे आर्थिक नुकसान पाहता, संबंधित अज्ञात आरोपीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




