दौंडमध्ये ‘रोहित पर्व’ सुरू दणदणीत विजयासह नगरपालिकेत प्रवेश..!
🔥MK NEWS36
सचिन आटोळे (विशेष राजकीय प्रतिनिधी)
दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आज लागला असला, तरी तो आश्चर्यकारक नव्हता. कारण प्रचार यंत्रणा, जनसंपर्क आणि मतदारांचा ठाम कल पाहता रोहित पाटील मतदानाच्या आधीच एकतर्फी विजयी ठरणार, हे स्पष्ट झाले होते. निकाल ही केवळ औपचारिकता होती, असे प्रभाग क्रमांक चारमधील मतदार ठामपणे सांगत होते. “रोहित शेठ, आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत,” अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत होती.
त्यामुळे प्रचार यंत्रणा अधिक ‘हायटेक’ करण्याची गरजच भासली नाही. एकतर्फी विजय निश्चित असल्याने ही निवडणूक पूर्णतः समर्थकांच्या ताब्यात असल्याचे चित्र दिसत होते. नागरिकांमध्येही संरक्षण मंडळाचा विजयी उमेदवार रोहितच ठरेल, याबाबत ठाम विश्वास होता. उमेदवार देण्यामागे रोहित यांचे कार्य, कर्तृत्व आणि जनसंपर्क कारणीभूत ठरले.
रोहित पाटील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच मित्रमंडळाच्या माध्यमातून सातत्याने सक्रिय राहिले आहेत. गणपती, गोपाळकाला, दहीहंडी तसेच विविध उत्सव समित्यांमधील त्यांचा सहभाग नेहमीच उल्लेखनीय राहिला आहे. जात-धर्म-पंथ याचा कोणताही भेद न करता सर्वांशी मिसळून काम करण्याची त्यांची पद्धतच या निवडणुकीत त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरली.
निकालाकडे पाहिल्यास, एकूण २,१९४ मतांपैकी रोहित पाटील यांना १,४०४ मते मिळाली, तर विरोधी उमेदवाराला ६७१ मते मिळाली. जवळपास ७०० मतांच्या फरकाने मिळालेला हा विजय जनतेने त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाचे स्पष्ट द्योतक आहे.
नगरपालिकेत तरुण चेहरा गेल्याने आगामी काळात कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. प्रभागासमोर अनेक आव्हाने असली, तरी आता नागरिकांनी निर्धास्तपणे आपल्या समस्या मांडाव्यात, असे मत व्यक्त होत आहे. मतदान केले असो वा नसो, प्रत्येकाचे काम करणे हेच आपले कर्तव्य असल्याचे रोहित पाटील यांचे स्पष्ट मत आहे. आता ते कोणत्याही एका पक्षाचे नसून संपूर्ण प्रभागाचे नगरसेवक आहेत.
या विजयामागे वडिलांच्या राजकीय कार्याचा वारसा लाभला, हेही विसरून चालणार नाही. लहानपणापासूनच वडिलांकडून राजकारणाचे धडे घेतलेल्या रोहित पाटील यांनी निवडणुकीत वेगळी, पण प्रभावी पद्धत अवलंबत लढत दिली आणि दणदणीत विजय मिळवला. दौंड नगरपालिकेत आता नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.




