ई-पेपरताज्या घडामोडीमनोरंजनराजकीयसामाजिक

“विरोधकांची वज्रमूठ तयार झाली तर बारामतीत तडफदार लढत!” — विरोधक एकत्र येतील का, की पुन्हा सत्ता एकाच घरात?


🔥MK NEWS36 

📰 बारामतीत निवडणुकीचे वारं! — “पैशाचा पाऊस की जनतेचा आवाज?”

✍️ (प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)

बारामती — सध्या बारामती शहरात निवडणुकीचे वारं जोमात वाहत आहे. नगरपरिषदेच्या या रंगतदार लढतीत उमेदवारांची झुंबड उडाली असून “आम्हीच खरे जनसेवक” अशी आरोळी देणारे असंख्य चेहरे पुढे येत आहेत. मात्र, या साऱ्या राजकीय गर्दीत एक प्रश्न मात्र नागरिकांच्या ओठांवर आहे — “या वेळी खऱ्या अर्थाने नागरिकांचे प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता नगरपालिकेत पोहोचेल का, की पुन्हा एकदा पैशाचा पाऊसच पडेल?”

गेल्या अनेक वर्षांपासून पवार घराण्याची एकहाती सत्ता असलेल्या बारामतीत, आता घरातच राजकीय मतभेद उफाळून आले आहेत. अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा अप्रत्यक्ष संघर्ष असला तरी दोघांचे म्हणणे एकच — “आम्ही वेगळे पण एकत्र आहोत.”
मात्र, जनतेला आता या “सोयस्कर विरोधाच्या” राजकारणाचा कंटाळा आला आहे.

दरम्यान, बसपा, वंचित बहुजन आघाडी, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या सर्व पक्षांनी आपल्या पातळीवरून तयारी सुरू केली आहे. पण विरोधक खरंच विरोधक आहेत का, की फक्त “राजकारणासाठीचा विरोध”? हा प्रश्न सध्या प्रत्येक नागरिकाला भेडसावत आहे.

शहरातील गल्लीबोळात, चहाच्या टपरीवर, आणि सोशल मीडियावर चर्चेचा एकच विषय — “या वेळेस खरंच कोणाला संधी मिळणार?”
कारण, अनेक कार्यकर्ते असे आहेत जे दिवस-रात्र लोकांसाठी धावतात, रात्रीच्या बाराला फोन आला तरी उत्तर देतात, साध्या नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवतात — पण अशा कार्यकर्त्यांना राजकारणात फारसं स्थान मिळत नाही.
त्यांच्या जागी पैशाची पिशवी घेऊन येणाऱ्यांचेच वारे वाहताना दिसतात.

या निवडणुकीत मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. कारण नागरिक आता सजग आहेत. “पैशाने मत विकत घेणारा उमेदवार जनतेच्या समस्या विकत घेईल का?” असा थेट प्रश्न लोक विचारू लागले आहेत.

नगरपालिकेत विकासाच्या नावाखाली अनेक कामे झाली, पण त्यावर नियंत्रण ठेवणारा ठोस विरोधक गेल्या काही काळात दिसला नाही. “विकास झाला पण उत्तरदायित्व कुणाचं?” असा सवाल नागरिक विचारत आहेत.

या वेळी जर विरोधकांनी एकजुटीने उमेदवार उभा केला, तर बारामतीत खरंच तुल्यबळ आणि तडफदार लढत होऊ शकते. अन्यथा, पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांचा विजय ठरलेला म्हणावा लागेल.

बारामतीकरांच्या मनात आता एकच भावना घोळत आहे —
👉 “आम्हाला झेंडा नको, जवाबदारी हवी!”
👉 “आम्हाला नेता नको, काम करणारा माणूस हवा!”

नगरपालिकेच्या या निवडणुकीत पैशाचा पाऊस पडतो की जनतेचा आवाज उठतो —
हेच पाहणं आता बारामतीकरांच्या मतदानपेटीत दडलं आहे!


Translate »
error: Content is protected !!