ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“पांढरेवाडी, वासुंदे, रोटी, जिरायातमध्ये गौण खनिज उत्खननावर सवाल; रिपब्लिकन सेनेची चौकशीची मागणी”


🔥MK NEWS36 

गौण खनिज परवानाधारकांकडून नियमांचे उल्लंघन?

पांढरेवाडी, वासुंदे, रोटी व जिरायात परिसरातील उत्खननाची चौकशी करण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी

दौंड : प्रतिनिधी प्रकाश सोनवणे

दौंड तालुक्यातील पांढरेवाडी, वासुंदे, रोटी व जिरायात हद्दीत गौण खनिज परवानाधारकांकडून नियमांचे उल्लंघन करून उत्खनन सुरू असल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेनेने दौंडचे उपविभागीय अधिकारी तथा न्यायदंडाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. संबंधित ठिकाणी योग्य ती पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करावा तसेच नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र राज्य महासचिव आयु. राहुल भालेराव यांनी दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात, दौंड तालुक्यातील वरील गावांच्या हद्दीत गौण खनिज परवानाधारकांकडून उत्खनन करताना प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या अटी व नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावा केला आहे.

या उत्खननामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत होत असून, लोकवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना याचा त्रास होत असून, धुळीमुळे नागरिकांसह वन्यप्राण्यांच्या जीवनावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

“संबंधित ठिकाणी योग्य ते निरीक्षण करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी राहुल भालेराव यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

दरम्यान, या तक्रारीनंतर प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी व तपासणी केली जाते का आणि गौण खनिज उत्खननाच्या परवान्यांतील अटींचे पालन होत आहे का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या पाहणीत नेमके काय निष्पन्न होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Translate »
error: Content is protected !!