ताज्या घडामोडी

प्रभाग १ मध्ये गाडे-थोरातांची चुरस — शेठचा उमेदवार कोण ठरणार?


🔥 MKNEWS36 

📰 प्रभाग १ मध्ये राजकीय पेच – गाडे की थोराताना? नागरिकहितचा डाव अजून गुप्तच!

सचिन आटोळे ✍️ प्रतिनिधी – दौंड

दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीला वेग आला असून आचारसंहिता लागू झाल्याने १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवार कोण असतील, हे मात्र २१ नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट होणार आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक १ मध्ये नागरिकहित पॅनलमधील उमेदवारीसाठी मोठी चुरस दिसून येत आहे.

या प्रभागात नितीन गाडे आणि श्रीकांत थोरात या दोघांनी आपापली ताकद दाखवत नागरिकहितचे सर्वेसर्वा प्रेमसुख कटारिया उर्फ “शेठ” यांच्याकडे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही जण शेठचे खंदे समर्थक असून राजकीयदृष्ट्या सक्षम मानले जातात. त्यामुळे शेठसमोर दोघांपैकी कोणाची निवड करायची, हा खरा पेच निर्माण झाला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दोघांनाही अर्ज भरण्यास सांगण्यात येऊ शकते. मात्र बंडखोरी टाळण्यासाठी अंतिम निर्णय २१ नोव्हेंबरनंतरच घेतला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या प्रभागाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे — मुस्लिम आणि ओबीसी मतदारांचा मोठा प्रभाव. त्यामुळे नागरिकहितकडून मुस्लिम समाजातील एका उमेदवारालाही संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, माजी नगराध्यक्ष आणि मुस्लिम समाजाचे नेते बादशाह शेख यांच्या प्रवेशामुळे नागरिकहित पॅनलची ताकद अधिक वाढली आहे. शेठ त्यांना कोणती नवी जबाबदारी देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. बादशाह शेख यांनी मुस्लिम मतदारांचा मोठा पाठिंबा मिळवला, तर नागरिकहितसाठी हा निर्णायक घटक ठरू शकतो.

शांतपणे पण योजनाबद्ध राजकीय डाव आखणारे शेठ आगामी काही दिवसांत नवा खेळ उघड करतील, अशी चिन्हे दिसत आहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरही त्यांची चाल अजून गुप्त ठेवली आहे. त्यामुळे दौंडच्या राजकारणात प्रभाग १ हा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.

📌 “गाडे-थोराताना की मुस्लिम समाजातील नवा चेहरा — नागरिकहितची पुढची चाल काय असेल?” या प्रश्नावर दौंडच्या राजकीय चर्चांचा तिढा सध्या गुंतला आहे.


Translate »
error: Content is protected !!