ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

“बारामतीतील ‘त्या’ पडीक घरात स्त्री जातीचा गर्भ कोणी टाकला? पोलिसांकडून तपासाची चक्रे गतिमान”


🔥MK NEWS36 

बारामतीत खळबळ: आमराई परिसरातील पडीक घरात आढळले ५ महिन्यांचे मानवी स्त्री अभ्रक; गुन्हा दाखल

बारामती (प्रतिनिधी):

बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्वोदय नगर, आमराई भागात एका पडीक घरामध्ये मानवी स्त्री जातीचा अंदाजे पाच महिन्यांचा गर्भ (अभ्रक) आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना काल, गुरुवारी (दि. ४ जून) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अशी उघडकीस आली घटना..!

मिळालेल्या माहितीनुसार, आमराई परिसरातील एका पडीक घरामध्ये मानवी गर्भासारखे अभ्रक पडले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी बारामती शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पाच महिन्यांचे स्त्री अभ्रक; वैद्यकीय तपासासाठी रवाना..

पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी तेथे अंदाजे पाच महिन्यांचे मानवी स्त्री जातीचे अभ्रक आढळून आले. या गर्भाची विघटन प्रक्रिया (कुजण्यास) सुरू झाली होती. प्राथमिक पाहणीत हे जैविक अवशेष (Biological Waste) असल्याचे दिसून आले आहे.

रहस्य कायम: सदर गर्भ या ठिकाणी नेमका कोणत्या परिस्थितीत आला? त्याची माता कोण आहे? तसेच हा गर्भ नैसर्गिकरित्या बाहेर पडला की गर्भपात करून तो तिथे टाकण्यात आला? याबाबत अद्याप कोणताही निश्चित निष्कर्ष निघू शकलेला नाही.

पोलिसांनी घटनास्थळाचे छायाचित्रण आणि व्हिडीओग्राफी केली असून, पुढील वैद्यकीय तपासणी, शवविच्छेदन व वैज्ञानिक परीक्षणासाठी सदर अभ्रक बारामतीमधील सिल्वर जुबली हॉस्पिटल येथे पाठवले आहे.

भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल..!

या धक्कादायक घटनेप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२४/२०२६ अन्वये, भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ९४, २३८ आणि २३९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड व पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. करे करत आहेत.

नागरिकांना घाबरू नये; माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन

“बारामती शहरातील नागरिकांनी या घटनेमुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. पोलीस प्रशासन सर्व आवश्यक कायदेशीर, वैद्यकीय आणि वैज्ञानिक तपास करत आहे. या प्रकरणाबाबत अथवा संबंधित व्यक्तींविषयी कोणाकडेही काही माहिती असल्यास त्यांनी तातडीने बारामती शहर पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल.”

— श्रीशैल चिवडशेट्टी (प्रभारी पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन)


Translate »
error: Content is protected !!