आरोग्य विभाग सुस्त, रुग्ण मात्र त्रस्त; निरनिमगाव-रेडणी उपकेंद्रांना ‘कुलूप’, जनतेचा जीव टांगणीला?
🔥MK NEWS36
आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत; निरनिमगाव, रेडणी उपकेंद्रांना ‘टाळे’, रुग्णांचे हाल कोणाच्या जीवावर?
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; ‘कामचुकार’ कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का?
इंदापूर (प्रतिनिधी – सागर समींदर):
ग्रामीण भागातील जनतेला तातडीची आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासनाने लाखो रुपये खर्चून उपकेंद्रे उभारली आहेत. मात्र, इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव आणि रेडणी येथील उपकेंद्रांची अवस्था ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी झाली आहे. दिनांक २ जून रोजी सकाळी ९:३० ते १०:०० च्या दरम्यान या दोन्ही उपकेंद्रांना चक्क कुलूप असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि डॉक्टरांना अद्याप जाग आलेली नाही, हे दुर्दैव आहे.

🎈नेमका प्रकार काय?
शासकीय नियमानुसार आरोग्य उपकेंद्रे सकाळी वेळेत उघडणे अनिवार्य आहे. मात्र, निरनिमगाव आणि रेडणी येथे कर्तव्यावर असलेल्या आरोग्य सेवकांना आणि डॉक्टरांना वेळापत्रकाचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी केली असता, सकाळी १० वाजत आले तरी उपकेंद्राचे दरवाजे उघडले गेले नव्हते.
ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी पायपीट करत या ठिकाणी येतात, मात्र त्यांना बंद दरवाजा पाहून रिकाम्या हाताने परतावे लागते. “आम्ही आजारी पडल्यावर कोणाकडे जायचे? सरकार पगार देते मग ही माणसे जातात कुठे?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
🎈यंत्रणेचा ढिसाळपणा आणि ‘ते’च उत्तर!
या भागातील आरोग्य केंद्रांच्या दुरवस्थेबाबत यापूर्वीही अनेकदा आवाज उठवण्यात आला आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसते. बातम्या प्रसिद्ध होऊनही जर कर्मचाऱ्यांना फरक पडत नसेल, तर याचा अर्थ त्यांना वरिष्ठांचे अभय आहे का? असा संशय आता बळावू लागला आहे.
📍लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडे डोळे
एकीकडे सरकार ‘आरोग्य संपन्न महाराष्ट्र’च्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे ग्राउंड लेव्हलवर मात्र उपकेंद्रांना टाळे ठोकले जात आहेत. या गंभीर प्रकारावर आता तालुका आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा परिषद आरोग्य विभाग काय कारवाई करणार? की दरवेळेप्रमाणे फक्त ‘चौकशी करू’ असे पोकळ आश्वासन देऊन वेळ मारून नेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“आरोग्य सेवा हा जनतेचा हक्क आहे. जर कर्मचारी कर्तव्यात कसूर करत असतील आणि उपकेंद्रांना कुलूप लावून गायब राहत असतील, तर अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे.” — स्थानिक ग्रामस्थ
💢प्रतिक्रियेची प्रतीक्षा:
या संदर्भात संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून ठोस उत्तर मिळू शकले नाही. आता ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर तरी प्रशासनाला पाझर फुटणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




