ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

बारामतीत भोंदूगिरीचा पर्दाफाश; महिलांची फसवणूक करणारा ‘मौलाना’ काश्मीरला पसार!


🔥MK NEWS36 

भोंदूगिरीचा पर्दाफाश: बारामती पोलिसांची मोठी कारवाई; महिलांची फसवणूक करणारा ‘मौलाना’ फरार

बारामती | विशेष प्रतिनिधी

अंधश्रद्धा, खोटे तांत्रिक उपाय आणि महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा बारामती शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. काळी विद्या दूर करण्याचे आमिष दाखवून महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या आणि लाखोंची माया लुटणाऱ्या मौलाना अब्दुल हलीम शेख याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, बारामती पोलिसांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

💥नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल हलीम शेख हा स्वतःला मोठा तांत्रिक आणि मौलाना असल्याचे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करत होता. घरगुती अडचणी, व्यावसायिक तोटा आणि कौटुंबिक कलह दूर करण्याचा दावा करत तो ‘दरबार’ भरवत असे. एका पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्या मनात धार्मिक भीती निर्माण करून काळी विद्या दूर करण्याच्या बहाण्याने वेळोवेळी रोख रक्कम, चेक आणि ऑनलाइन माध्यमातून मोठी रक्कम उकळली.

💥विनयभंगाचा प्रयत्न आणि धमक्या

केवळ आर्थिक फसवणूकच नाही, तर या भोंदू मौलानाने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचे समोर आले आहे. तांत्रिक उपायांच्या नावाखाली पीडित महिलेला रात्री-अपरात्री बोलावून तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले. तसेच, “तुझ्या कुटुंबाला त्रास होईल”, “वाईट परिणाम होतील” अशा धमक्या देऊन महिलेला मानसिक दहशतीखाली ठेवले होते.

🗞️पोलिसांच्या हाती लागले भक्कम पुरावे..!

बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास अत्यंत सूक्ष्मपणे केला आहे. आरोपीने PhonePe आणि UPI द्वारे केलेले व्यवहार, व्हॉट्सॲप चॅट्स आणि मोबाईल कॉल रेकॉर्ड्स यांसारखे महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

💢कारवाईचे पथक:

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी व पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

🏃आरोपीचा काश्मीरमध्ये पळ..!

गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागताच मुख्य आरोपी अब्दुल हलीम शेख हा काश्मीरला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस पथक तांत्रिक आधारावर त्याचा शोध घेत असून, त्याला लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

🚨पोलीस प्रशासनाचे आवाहन..!

“बारामती शहर परिसरात अशा प्रकारे कोणत्याही भोंदूबाबाने किंवा मांत्रिकाने नागरिकांची फसवणूक केली असल्यास त्यांनी घाबरून न जाता थेट बारामती शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तक्रारदाराची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल,” असे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी केले आहे.

सावधान: सोशल मीडियावरील जाहिराती आणि धार्मिक भीती दाखवून फसवणूक करणाऱ्या भोंदूगिरीला नागरिकांनी बळी पडू नये, असेही पोलिसांनी या निमित्ताने स्पष्ट केले आहे.


Translate »
error: Content is protected !!