भीमा पाटस कारखान्यात मध्यरात्री ‘भंगार’ नाट्य; ३ कोटींचा स्क्रॅप माल परस्पर विक्रीचा डाव सभासदांनी उधळला..!
🔥MK NEWS36
भीमा पाटस कारखान्यात कोट्यवधींचा स्क्रॅप घोटाळा उघड? जागरूक सभासदांमुळे ‘तो’ ट्रक रोखला; सखोल चौकशीची मागणी
दौंड (विशेष प्रतिनिधी):
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (भीमा पाटस) आवारात बुधवारी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारखान्याच्या जुन्या मशिनरीमधील जस्त, निकेलच्या जाळ्या आणि कॉपरचे पाईप असा सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचा स्क्रॅप (भंगार) परस्पर कर्नाटक पासिंगच्या ट्रकमध्ये भरून विक्रीसाठी नेला जात असल्याचा संशय जागरूक सभासदांनी व्यक्त केला आहे. साखर आयुक्त कार्यालयाच्या सतर्कतेमुळे हा ट्रक गेटवरच रोखण्यात आला असून, सध्या परिसरात या ‘स्क्रॅप घोटाळ्या’ची जोरदार चर्चा सुरू आहे.
🗞️नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी कारखाना परिसरात KA 22 AA 0536 क्रमांकाचा एक रिकामा ट्रक दाखल झाला. या ट्रकमध्ये कारखान्यातील मौल्यवान धातूंचे भंगार भरले जात असल्याचे काही जागरूक सभासदांच्या निदर्शनास आले. हे साहित्य कायदेशीर प्रक्रियेद्वारे विकले जात आहे की त्याची चोरी होत आहे, याबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती. सभासदांनी तातडीने प्रादेशिक सहसंचालक (साखर) आणि साखर आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधला. साखर आयुक्तालयाने चक्रे फिरवताच, वजनकाट्यावरून बाहेर पडणारा हा ट्रक अचानक माघारी वळवून पुन्हा स्क्रॅप यार्डमध्ये खाली करण्यात आला. या प्रकारामुळे संशयाची सुई प्रशासनाकडे वळली आहे.
💢नियमांची पायमल्ली?
भीमा सहकारी साखर कारखाना सध्या २५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर ‘निराणी ग्रुप’ (साईप्रिया शुगर) चालवत आहे. करारातील अटीनुसार:
कारखान्याच्या जुन्या मशिनरीमधील स्क्रॅप विकण्याचा अधिकार भाडेकरू संस्थेला नाही.
असे स्क्रॅप विकण्यासाठी साखर आयुक्तालयाची पूर्वपरवानगी आवश्यक असते.
रीतसर टेंडर काढून लिलाव पद्धतीनेच याची विक्री होणे बंधनकारक आहे.
परंतु, अशी कोणतीही प्रक्रिया न राबवता परस्पर कोट्यवधींचा माल विकण्याचा डाव सभासदांनी हाणून पाडला आहे.
📍कारखाना ‘बेवारस’ स्थितीत?
सध्या कारखान्याची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे चित्र आहे.
१. संचालक मंडळ बरखास्त: प्रादेशिक सहसंचालकांनी मागील काही दिवसांपूर्वीच विद्यमान संचालक मंडळ बरखास्त केले आहे.
२. प्रशासकांचा अभाव: नेमलेल्या प्रशासकांनी १७-१८ दिवस उलटूनही अद्याप पदभार स्वीकारलेला नाही.
३. बेकायदेशीर प्रभारी संचालक: प्रभारी कार्यकारी संचालक श्री. तुषार पवार यांच्या नेमणुकीला साखर आयुक्त कार्यालयाची मान्यता नाही. तरीही ते बरखास्त संचालक मंडळाच्या ‘आशीर्वादाने’ कामकाज पाहत असल्याचा आरोप सभासदांनी केला आहे.
📍सभासदांच्या प्रमुख मागण्या:
कारखान्याचे कोट्यवधींचे नुकसान होत असताना याला जबाबदार कोण? असा प्रश्न सभासद विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून खालील मागण्या करण्यात येत आहेत:
यापूर्वी झालेल्या स्क्रॅप विक्रीचीही चौकशी व्हावी.
परस्पर माल विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या बेकायदेशीर व्यक्तींवर गुन्हे दाखल व्हावेत.
साखर आयुक्तांनी तातडीने या प्रकरणाचा अहवाल मागवून कारवाई करावी.
भाडेतत्त्वावर चालणाऱ्या कारखान्यात मूळ मालकी असलेल्या सभासदांच्या मालमत्तेची अशी लूट होत असेल, तर प्रशासन काय करत आहे? असा जळजळीत प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. आता यावर साखर आयुक्त कार्यालय काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




