ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

निरवांगी-दगडवाडीच्या २२ गावांचा पाणीप्रश्न मार्गी लावणार; दत्तात्रय भरणेंचे आश्वासन


🔥MK NEWS36 

नंदिकेश्वर मंदिर सुशोभीकरणासाठी ५० लाखांचा निधी; दुष्काळमुक्तीसाठी शंभू महादेवाला साकडे

कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते विकासकामाचे उद्घाटन; निरवांगी-दगडवाडी परिसरातील २२ गावांचा पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन

निरवांगी : प्रतिनिधी सागर समींदर

श्री क्षेत्र नंदिकेश्वर मंदिर, दगडवाडी-निरवांगी येथे मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी मंजूर करण्यात आलेल्या ५० लाख रुपयांच्या निधीच्या विकासकामाचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सारिका मामी भरणे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या निमित्ताने दत्तात्रय मामा भरणे व सौ. सारिका मामी भरणे यांच्या हस्ते श्री शंभू महादेवाचा अभिषेक करण्यात आला. तसेच श्री नंदिकेश्वराचे दर्शन घेऊन महाराष्ट्रावर असलेले दुष्काळाचे सावट दूर व्हावे, राज्यात मुसळधार पाऊस पडून शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य व गटनेते श्रीमंत ढोले सर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री. अप्पासाहेब जगदाळे, इंदापूर पंचायत समितीचे सभापती मा. श्री. हर्षवर्धन लोंढे, उपसभापती जयकुमार कारंडे, पंचायत समिती सदस्य बापूराव शिंदे व विमलताई काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंदिर विकासासाठी सातत्याने निधी

दत्तात्रय मामा भरणे यांनी निरवांगी-दगडवाडी येथील श्री नंदिकेश्वर देवस्थानच्या विकासासाठी यापूर्वीही सभामंडप व खोल्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून, आता मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या विकासकामाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

तसेच निरवांगी-दगडवाडी परिसरासह २२ गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दत्तात्रय मामा भरणे यांनी यावेळी दिले.

प्रत्येक गावापर्यंत विकासनिधी पोहोचविण्याचा प्रयत्न

जिल्हा परिषद गटनेते श्रीमंत ढोले यांनी यावेळी विकासकामांबाबत मार्गदर्शन केले. दत्तात्रय मामा भरणे यांनी इंदापूर तालुक्यात विकासकामांचा ध्यास घेऊन विविध कामे मार्गी लावली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेमार्फत उपलब्ध होणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीकडून प्रामाणिकपणे प्रस्ताव घेऊन विकासनिधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ढोले यांनी स्पष्ट केले.

नीरा नदीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी नीरा नदीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत मार्गदर्शन केले. नदीवरील बंधारे दुरुस्त करून पाणी अधिक काळ साठवून ठेवता यावे आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच एका बंधाऱ्याची जबाबदारी स्वतः घेऊन त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी हर्षवर्धन लोंढे, जयकुमार कारंडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.

श्रावणातील शेवटच्या सोमवारी नंदिकेश्वराची मोठी यात्रा

श्री नंदिकेश्वर हे दगडवाडी-निरवांगी व पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात यात्रा भरते. यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र शिंगणापूर येथून ज्योत आणली जाते. तसेच गावच्या मानाच्या नंदीची मिरवणूक काढण्यात येते.

या यात्रेला निरवांगी, दगडवाडी तसेच पंचक्रोशीतील विविध गावांमधून भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. धार्मिक वातावरणात यात्रा उत्साहात पार पडत असते.

कार्यक्रमास दगडवाडी-निरवांगी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे चेअरमन व संचालक, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!