मतदान चोरीचे आरोप फेटाळले – निवडणूक आयोगाचा ठाम पवित्रा..!
MK NEWS 36
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद : मतदान चोरीचे आरोप फेटाळले..
नवी दिल्ली : अलीकडेच विविध राजकीय पक्षांकडून करण्यात आलेल्या मतदान चोरीच्या आरोपांवर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन अधिकृत प्रतिक्रिया दिली. आयोगाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, देशातील मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने राबवली जाते.
आयोगाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, “मतदान चोरी, ईव्हीएममध्ये फेरफार किंवा मतदार याद्यांमध्ये अनियमितता” अशा प्रकारचे आरोप पूर्णपणे निराधार असून केवळ जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक टप्प्यावर कडक देखरेख, सीसीटीव्ही निरीक्षण, पोलिस सुरक्षा तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीतच मतदान प्रक्रिया पार पडते. त्यामुळे मतदान चोरी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

याशिवाय आयोगाने हेही स्पष्ट केले की, निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेले कर्मचारी, अधिकारी व निरीक्षक यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले असते. सर्व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) व व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) ही यंत्रणा अत्यंत सुरक्षित असून, अनेक स्तरांवर तपासणीनंतरच वापरली जाते.
आयोगाची महत्त्वाची सूचना
आयोगाने स्पष्ट केले की, जर कोणाला निवडणूक प्रक्रियेबाबत काही तक्रार असेल तर ती तक्रार कायद्याने निर्धारित केलेल्या ४५ दिवसांच्या कालावधीत दाखल करता येते. यापुढे ज्या राजकीय पक्षांकडे किंवा व्यक्तीकडे ठोस पुरावे असतील त्यांनी ते येत्या १५ दिवसांच्या आत आयोगाकडे सादर करावेत. आयोग त्या पुराव्यांचा गांभीर्याने विचार करेल, पण केवळ आरोप करून लोकशाही प्रक्रियेवर शंका निर्माण करणे गैरजबाबदारपणाचे आहे.
आयोगाने राजकीय पक्षांना आवाहन केले की, निराधार आरोप न करता जनतेचा विश्वास टिकवावा आणि ठोस पुरावे असल्यासच पुढे यावे. “लोकशाही प्रक्रियेवर शंका घेणं म्हणजे मतदारांच्या निर्णयाचा अपमान आहे,” असे आयोगाचे ठाम म्हणणे आहे.
संपूर्ण देशभर पार पडलेले मतदान शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत पार पडले असल्याचा पुनरुच्चारही आयोगाने या पत्रकार परिषदेत केला..




