“बारामतीत मध्यरात्री पोलिसांचा छापा; अवैध कत्तल उधळली, १७ गोवंश वाचले”
🔥MK NEWS36
बारामतीत अवैध गोवंश कत्तल रोखली; पोलिसांची धाडसी कारवाई, १७ जनावरे सुरक्षित
बारामती, दि. 20 एप्रिल 2026 — बारामती शहर पोलिसांनी अवैध गोवंश कत्तल प्रकरणात मध्यरात्री धाड टाकत मोठी कारवाई केली. गोकुळनगर, मळद (मळद–फलटण रोड) येथे 19 एप्रिल रोजी उशिरा रात्री झालेल्या या कारवाईत १० गायी व ७ बैल असे एकूण १७ जनावरे जप्त करून त्यांना सुरक्षिततेसाठी गोशाळेत हलविण्यात आले.

पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच कत्तल करणाऱ्यांचा डाव उधळला गेला. मात्र, अंधाराचा फायदा घेत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 150/2026 दाखल करण्यात आला असून संबंधित कायद्यांनुसार पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. “गोवंश कत्तल व प्राण्यांवरील क्रूरतेबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले जाईल,” असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, सहाय्यक उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्यासह पथकाने ही धाड यशस्वी केली.
दरम्यान, फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्या पूर्व गुन्हेगारी नोंदींचीही तपासणी करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
जप्त केलेली सर्व जनावरे मळद येथील दयोदय गोशाळेत सुरक्षित ठेवण्यात आली असून त्यांची योग्य काळजी घेतली जात आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




