“उपकेंद्र गायब, हजरी कायम! पळसमंडळात आरोग्य सेवकाचा ‘भुताटकी’ कारभार?”
🔥MK NEWS36
🔥 “आरोग्य सेवकाचा दादागिरीचा कळस! पळसमंडळ उपकेंद्रात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?” 🔥
सागर समिंदर, प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या पळसमंडळ उपकेंद्रात सध्या बेफिकिरीचा कळस गाठला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या आरोग्य सेवकानेच जबाबदारी झुगारून दिल्याने संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, संबंधित आरोग्य सेवक हा केवळ गैरहजरच नाही, तर त्याच्या वागण्यात प्रचंड घमेंड आणि वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याचा आभास दिसून येतो. अनेकदा बातम्या प्रसिद्ध होऊनही हा कर्मचारी एकदाही केंद्रावर हजर राहत नाही, हे विशेष धक्कादायक आहे. “मी कोणाला घाबरत नाही, माझी वरपर्यंत ओळख आहे,” असा अप्रत्यक्ष संदेश देत तो प्रशासनालाच खुलेआम आव्हान देत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

उपकेंद्रावर प्रत्यक्षात फक्त नर्सच कार्यरत असल्याचे दिसून येते. नागरिकांनी आरोग्य सेवकाबाबत विचारणा केली असता, “ते व्हिजिटला गेले आहेत,” असे ठरलेले उत्तर दिले जाते. मात्र, स्थानिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचाऱ्याचे लोकेशन तपासले असता तो अनेकदा बाहेरगावी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे हा सर्व प्रकार नियोजित पद्धतीने सुरू असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.
प्रश्न असा उपस्थित होतो की, हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच सुरू आहे का? की संबंधित अधिकाऱ्यांनाच याची कल्पना असूनही ते जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत? जर पुराव्यानिशी गैरहजेरी सिद्ध होत असेल, तर अद्याप कारवाई का झालेली नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, “आमच्या टॅक्सच्या पैशातून पगार घेणारे अधिकारीच आम्हाला वेटीस धरत असतील, तर न्याय कुठे मिळणार?” असा थेट प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होत असल्याचे स्पष्ट दिसते.
नागरिकांनी आता ठाम भूमिका घेतली असून, “जर स्थानिक स्तरावर कारवाई झाली नाही, तर वरिष्ठ पातळीवर तक्रार करून कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा देण्यात आला आहे. संबंधित आरोग्य सेवकावर तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी जोर धरत आहे.
👉 आरोग्य व्यवस्थेतील हा निष्काळजीपणा थांबणार कधी?
👉 संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार का?
👉 की नागरिकांचे आरोग्य असेच वाऱ्यावर सोडले जाणार?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनानेच द्यायची आहेत… नाहीतर जनतेचा उद्रेक अनिवार्य ठरणार! 🚨




