माळेगाव सोसायटीला जिल्हा बँकेची ‘मानाची ढाल’
🔥MK NEWS 36
प्रतिनिधी
माळेगाव बुद्रुक सोसायटीची जिल्हा बँकेकडून उत्कृष्ट कार्याबद्दल निवड
बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने सन 2024-25 या आर्थिक वर्षात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने तालुकास्तरावरील कायमस्वरूपी “मानाची ढाल” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा सन्मान दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे.
1951 साली कै. शिवाजीराव साहेबराव पैठणकर यांच्या पुढाकारातून स्थापन झालेली ही सोसायटी आज प्रचंड प्रगतीच्या टप्प्यावर पोहोचली आहे. अत्यल्प भागभांडवलातून उभारलेल्या संस्थेने सध्या 737 सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. संस्थेकडे सभासद शेअर्स 41 लाख 49 हजार 60 रुपये असून ठेवी 1 कोटी 92 लाख 31 हजार 598 रुपये इतक्या जमा आहेत. सन 2024-25 मध्ये सोसायटीने तब्बल 8 लाख 20 हजार 423 रुपयांचा नफा नोंदविला आहे.
या वर्षी संस्थेच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्यातच उत्कृष्ट कार्याबद्दल मानाची ढाल मिळणे हा दुग्धशर्करा योग ठरला आहे.
संस्थेच्या प्रगतीत माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन रंजनकुमार शंकरराव तावरे व बाळासाहेब पाटील तावरे, तसेच खरेदी विक्री संघाचे माजी संचालक मनोज नामदेवराव सस्ते यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. विशेष म्हणजे यावर्षी सोसायटीने चेअरमन व व्हा. चेअरमन पदे महिलांकडे सोपवून आदर्श घालून दिला आहे.
आर्थिक प्रगतीसोबतच संस्थेने सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सीएसटी सेंटरच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना सभासदांपर्यंत पोहोचविणे, आरोग्य शिबिरे, उस परिसंवाद आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत.
संस्थेच्या विद्यमान नेतृत्वात चेअरमन सीमा सस्ते, व्हा. चेअरमन शुभांगी तावरे, संचालक मंडळातील निशिगंध तावरे, वसंतराव तावरे, संपतराव लोणकर, शशिकांत तावरे, सचिन पैठणकर, दिग्विजय जाधवराव, दिलीप बुरुंगले, विजय भोसले, अभिजीत तावरे, वीरेंद्र भुंजे, प्रताप तावरे, गौरव निंबाळकर, विनोद सस्ते, रमेश नलवडे, प्रमोद मानसिंगराव जाधव तसेच सचिव विकास तावरे व मदतनीस शशिकांत देवकाते यांचा विशेष सहभाग आहे.




