ई-पेपरक्राईमब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

बारामतीत युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; मुख्य आरोपी अटकेत..!


🔥MK NEWS36 

बारामतीत युवकाचे अपहरण करून मारहाण; मुख्य आरोपी अटकेत, दोन दिवसांची पोलीस कोठडी

बारामती : तालुक्यातील सुभद्रा मॉल परिसरात एका युवकाला जबरदस्तीने गाडीत बसवून नेऊन मारहाण व धमकी देण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतिक राजेंद्र धंगेकर (वय 23, रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) हे दि. 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुभद्रा मॉल येथे मोबाईल दुरुस्तीसाठी गेले होते. काम आटोपून बाहेर पडत असताना आरोपी भारत मोहिते, अक्षय सोनवणे व अधिराज मोरे हे सुझुकी फ्रान्क्स चारचाकी गाडीतून आले. त्यांनी धंगेकर यांना बोलावून गाडीत बसवले.

गाडीत बसल्यानंतर “पिंटू धुमाळ याच्याबाबत काय बोललास?” असा जाब विचारत आरोपी भारत मोहिते याने धंगेकर यांच्या कानाखाली मारल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आरोपींनी गाडी तांदुळवाडी दिशेने नेऊन एचपी पेट्रोलपंपाच्या मागील बाजूस थांबवली. येथे धंगेकर यांना खाली उतरवून अक्षय सोनवणे व इतरांनी लाकडी दांडक्याने पाठीवर, हातावर तसेच पायावर मारहाण केली. यावेळी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

मारहाणीनंतर आरोपींनी धंगेकर यांना रस्त्यावर सोडून दिले. त्यानंतर त्यांनी आपल्या मित्राला फोन करून मदत बोलावली व दोघे मिळून पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी प्रथम शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवून नंतर तक्रार नोंदवली.

या घटनेत फिर्यादीचे पैसेही काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. पिंटू उर्फ शरद यशवंत धुमाळ यांच्या सांगण्यावरून हा प्रकार घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 199/2026 अंतर्गत बी.एन.एस. कलम 115(2), 118(1), 127(2), 49, 351(2), 351(3), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्य आरोपी पिंटू उर्फ शरद धुमाळ याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम हे करत असून, पोलीस हवालदार वीर यांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.


Translate »
error: Content is protected !!