बोराटवाडीत कृष्णा आक्का देवीची यात्रा उत्साहात; वैशाख पौर्णिमेला भक्तांची मोठी गर्दी..!
🔥MK NEWS36
बोराटवाडीत वैशाख पौर्णिमेनिमित्त कृष्णा आक्का देवीची यात्रा उत्साहात संपन्न..!
सागर समिंदर प्रतिनिधी (इंदापूर/ माळशिरस)
बोराटवाडी (ता. इंदापूर): बोराटवाडी येथे ग्रामदेवी कृष्णा आक्का देवी व रेणुका देवी (यल्लमा) यांची पारंपरिक यात्रा वैशाख पौर्णिमेनिमित्त मोठ्या उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेला गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी उपस्थिती लावली.
यात्रेनिमित्त देवीला साडी-चोळी, बांगड्या अर्पण करून लिंबाचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सजवलेल्या रथातून देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान भंडाऱ्याची उधळण करण्यात आली असून, ढोल-ताशांच्या गजरात व भक्तिगीतांच्या निनादात वातावरण भक्तिमय झाले होते.

या सोहळ्यात महिला भक्तांचा विशेष सहभाग दिसून आला. अनेक भाविकांनी देवीसमोर नवस बोलून आपली श्रद्धा व्यक्त केली. ‘नवसाला पावणारी कृष्णा आक्का देवी’ अशी या देवस्थानाची ओळख असून, भाविकांमध्ये तिच्याबद्दल अपार श्रद्धा आहे.
यात्रेची सांगता जन-जोगती कार्यक्रमाने झाली. यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले. देवीचा अभिषेक करून साडी-चोळी व बांगड्या अर्पण करण्यात आल्या.
यात्रा समितीच्या वतीने सर्व भाविकांसाठी अन्नदान व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य पुजारी गुलाबराव शिंदे यांनी विधीवत पूजा-अर्चा पार पाडली.
एकूणच, बोराटवाडीतील ही पारंपरिक यात्रा भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरली.




