श्रवणदोषावर मात करत नियुक्ती खरातची भरारी; दहावीत ८९.२० टक्के गुण..!
🔥MK NEWS36
दिव्यांगत्वावर मात करत नियुक्ती खरातची यशस्वी झेप; दहावीत ८९.२० टक्के गुण..!
माळेगाव प्रतिनिधी :
हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि श्रवणदोषासारख्या मोठ्या अडचणींवर मात करत बारामती येथील नियुक्ती अमोल खरात हिने दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्या प्रतिष्ठानच्या विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थिनी असलेल्या नियुक्तीने तब्बल ८९.२० टक्के गुण मिळवत परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे.

नियुक्ती अमोल खरात..८९.२०%
लहानपणी एका लग्न समारंभात डीजेच्या कर्कश आवाजामुळे नियुक्तीच्या दोन्ही कानांवर गंभीर परिणाम झाला. त्यानंतर तिला ऐकू येणे पूर्णपणे बंद झाले. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असतानाही आई-वडिलांनी तिच्यावर विविध मोठ्या रुग्णालयांत उपचार केले. कानाची अनेक तपासण्या करण्यात आल्या, तसेच श्रवणयंत्रही लावण्यात आले; मात्र त्यातून अपेक्षित फायदा झाला नाही.
अशा प्रतिकूल परिस्थितीतही नियुक्तीने हार न मानता शिक्षणाची वाट सोडली नाही. ऐकू येत नसतानाही शिक्षकांच्या ओठांच्या हालचाली ओळखून शिकण्याची कला तिने आत्मसात केली. जिद्द, चिकाटी आणि स्वअध्ययनाच्या जोरावर तिने कोणतीही खासगी शिकवणी न लावता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले.
तिच्या या यशामध्ये आई स्वाती खरात, वडील अमोल खरात आणि मोठी बहीण श्रुती खरात यांचे मोठे योगदान राहिले. अभ्यासात त्यांनी तिला सातत्याने मदत आणि प्रोत्साहन दिले. शाळेचे प्राचार्य आशिष घोष तसेच वर्गशिक्षिका खोडवे यांनी नियुक्तीचे विशेष अभिनंदन करत तिच्या जिद्दीचे कौतुक केले.
“माझे आदर्श महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. उच्च शिक्षण घेऊन मोठी अधिकारी बनायचे असून माझी आणि कुटुंबाची परिस्थिती बदलायची आहे,” अशी भावना नियुक्ती खरात हिने व्यक्त केली.
नियुक्तीच्या या संघर्षमय यशकथेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून ती अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.




