ड्रीम्स डिझाईनर्स फाऊंडेशनची सामाजिक बांधिलकी; निवासी शाळांना मदतीचा हात..!
🔥MK NEWS36
सुपे व गोजुबावी येथील निवासी शाळांना भेट; गरजू मुलांसाठी किराणा साहित्य वाटप..!
(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)
बारामती : सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवा जपत ड्रीम्स डिझाईनर्स फाऊंडेशनचा उपक्रम
बारामती येथील ड्रीम्स डिझाईनर्स फाऊंडेशन ही नोंदणीकृत सामाजिक संस्था दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण करत आहे. वर्षाअखेरीस संस्थेच्या वतीने सुपे येथील प्राजक्ता मतिमंद मुलांची निवासी शाळा तसेच गोजुबावी येथील निवासी शाळेला भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान शाळेतील मुलांसाठी तसेच संस्थेच्या गरजांसाठी किराणा साहित्य स्वरूपात मदत करून संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी प्रत्यक्ष कृतीतून जपली.

या उपक्रमात ड्रीम्स डिझाईनर्स फाऊंडेशनच्या सर्व सभासदांनी “खारीचा वाटा” उचलत स्वेच्छेने सहकार्य केले. या सहकार्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. गीता पोटे यांनी सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार मानले.
बारामती शहरात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व विविध उपक्रमांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही संस्था नाव लौकिक मिळवत आहे. याच अनुषंगाने, जानेवारी २०२६ मध्ये ९ ते ११ तारखेदरम्यान जिजाऊ मंगल कार्यालय, बारामती येथे संक्रांती निमित्त महिलांसाठी तीन दिवसीय भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
या सामाजिक उपक्रमात संस्थेच्या अध्यक्षा सौ. गीता पोटे, सचिव सौ. दर्शना जैन व त्यांचे कुटुंबीय, खजिनदार कु. संस्कृती पोटे तसेच संस्थेचे सल्लागार श्री. अश्विनी कुमार पतकी यांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी सौ. दर्शना जैन यांनी निवासी शाळेच्या संस्थापकांना ड्रीम्स डिझाईनर्स फाऊंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
दोन्ही निवासी शाळांच्या व्यवस्थापनाने या उपक्रमाबद्दल ड्रीम्स डिझाईनर्स फाऊंडेशन, बारामती यांचे विशेष कौतुक करत संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
सध्या सुमारे २०० सभासद असलेल्या या संस्थेकडून पुढील येणाऱ्या वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येत असून, समाजातील विविध घटकांसाठी कार्य करण्याचा संस्थेचा संकल्प अधिक बळकट होत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.




