जिल्हा परिषद निवडणूक: बारामतीत ५५८ टपाली मते नोंद..!
🔥MK NEWS36
बारामती तालुक्यात टपाली मतपत्रिकेद्वारे ५५८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क…!
बारामती, दि. ८ —
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बारामती तालुक्यात टपाली मतदानासाठी मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. तालुक्यात टपाली मतदानासाठी एकूण ७४३ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ६ फेब्रुवारी अखेर ५५८ मतदारांनी टपाली मतपत्रिकेद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
टपाली मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली असून विविध गटांमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. सुपा गटाअंतर्गत सुपा गणात ४१ तर काऱ्हाटीमध्ये ४७ मतदारांनी टपाली मतदान केले. गुणवडी गटाअंतर्गत शिर्सुफळ येथे ३१ व गुणवडी येथे २८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
पणदरे गटात पणदरे येथे सर्वाधिक ८१ तर मूढाळे येथे ४० मतदारांनी टपाली मतदान केले. वडगाव निंबाळकर गटाअंतर्गत मोरगाव येथे ६१ व वडगाव निंबाळकर येथे ३७ मतदारांनी मतदान केले आहे. निंबुत गटात निंबुत येथे ६६ व कांबळेश्वर येथे ४७ टपाली मतदानाची नोंद झाली आहे. तसेच निरा-वागज गटाअंतर्गत निरावागज येथे ४३ तर डोर्लेवाडी येथे ३६ मतदारांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान केले आहे.
एकूण ५५८ टपाली मते नोंदवली गेली असून, टपाली मतदानाच्या माध्यमातून मतदारांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे, असेही श्री. नावडकर यांनी सांगितले.




