विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पतीचा घातक निर्णय – गर्भवती पत्नीचा खून!
🔥MK NEWS 36
💥 पतीकडून गर्भवती पत्नीचा निर्घृण खून; २४ तासांत पोलिसांकडून उकल
भिगवण (ता. इंदापूर) –
भिगवण ते बारामती मार्गावरील मदनवाडी गावाच्या हद्दीत देवकाते वस्ती येथील ओढ्याच्या पुलाखाली ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला एका महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अल्पावधीतच पोलिसांनी या खुनाचा छडा लावत आरोपी म्हणजेच मृत महिलेचा पती असल्याचे उघड केले आहे.
❗ पुलाखाली आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह..!
२२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मदनवाडी गावचे पोलीस पाटील नानासाहेब हनुमंत वनवे (वय ४४, रा. मदनवाडी, ता. इंदापूर) यांनी पुलाखाली ब्लँकेटमध्ये काहीतरी बांधून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना दिली.
भिगवण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, कुजलेल्या अवस्थेतील एका महिलेचा मृतदेह आढळला. तिचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे असून, डोक्याची कवटी फुटलेली होती. हातावर ‘रविराज’ असे गोंदवलेले आढळले.
पोलिसांनी प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून पुलाखाली टाकल्याची शक्यता व्यक्त केली.
👮 वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
घटनेनंतर पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल (पुणे ग्रामीण) यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी (कोल्हापूर परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची तीन विशेष पथके तपासासाठी तयार करण्यात आली.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवणे कठीण ठरले. मात्र, हातावरील गोंदनाचा फोटो परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांना व नागरिकांना पाठवण्यात आला.
🔍 ‘रविराज’ या गोंदनातून ओळख पटली
गोपनीय माहितीच्या आधारे मृतदेह हा दिपाली सुदर्शन जाधव (वय ३०, रा. कटफळ, ता. बारामती) यांचा असावा, अशी माहिती मिळाली. तिचे पती सुदर्शन उर्फ रविराज रणजीत जाधव (वय ३६) यांनी १४ ऑक्टोबर रोजी पत्नी हरवल्याची तक्रार बारामती पोलिसांकडे दिली होती.
हातावरील गोंदन पाहून त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली.
😱 पतीकडून गर्भवती पत्नीचा खून
तपासादरम्यान सुदर्शन जाधव यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
दिपाली ही गर्भवती होती आणि तिचे विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचा संशय पतीला होता. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी वाद झाल्यानंतर रागाच्या भरात सुदर्शन यांनी लोखंडी वस्तूने पत्नीच्या डोक्यावर वार करून खून केला.
त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून ज्युपिटर दुचाकीवरून मदनवाडी परिसरातील पुलाखाली फेकून दिला.
आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
👏 पोलिसांचा शर्थीचा तपास
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, कुलदीप संकपाळ, बाळासाहेब कारंडे, अभिजीत शिंगे, स्वप्निल अहिवळे, अतुल ढेरे, ज्ञानेश्वर क्षीसागर ,अजय धुले, निलेश शिंदे, अजय देडे, तसेच भिगवण पोलिस स्टेशनचे सचिन पवार, महेश उगले, रामदास करचे, संतोष मखरे, गणेश करचे, आप्पा भांडवलकर, रणजीत मुळीक, मयूर बोबडे, विठ्ठल वारघड, वर्षा जामदार, कविता माने, तसेच पोलीस पाटील शमल पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रकरणाचा पुढील तपास भिगवण पोलीस ठाणे करत आहे.
🗣️ “२४ तासांत आरोपीला पकडण्यात यश”
> “मृतदेहाची ओळख पटवणे सुरुवातीला आव्हानात्मक होते. मात्र, पथकाने अथक प्रयत्न करून ठोस धागे मिळवले आणि अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक करण्यात यश आले. या कारवाईत सर्व पथकांनी उत्कृष्ट समन्वय साधला. अशा तपासातून पोलिसांवरील लोकांचा विश्वास अधिक दृढ होतो.”
— सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे




