बारामतीत सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार; पोलीस असल्याचे सांगून लाखोंची लूट..!
🔥MK NEWS36
बारामतीत ‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार; 74 वर्षीय महिलेला 45.60 लाखांचा गंडा..!
बारामती : बारामती शहरात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवत एका 74 वर्षीय महिलेकडून तब्बल 45 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला उद्धव खर्डे (वय 74, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांना 14 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीत एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवरून WhatsApp व्हिडिओ कॉल केला. संबंधित इसमाने स्वतःला “संदीप पाटील” नावाचा पोलीस अधिकारी असल्याचे सांगत पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल करून विश्वास संपादन केला.
यानंतर फिर्यादी महिलेविरुद्ध अटक वॉरंट असल्याचे सांगत “डिजिटल अरेस्ट” होईल अशी भीती दाखवण्यात आली. भीती व मानसिक दबाव निर्माण करून आरोपीने महिलेच्या बँकेतील फिक्स डिपॉझिट (FD) तोडण्यास भाग पाडले. आरोपीच्या सांगण्यावरून त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांवर 34 लाख 60 हजार रुपये आणि 11 लाख रुपये अशी एकूण 45 लाख 60 हजार रुपयांची रक्कम वर्ग केली.
नंतर आरोपीशी संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 83/2026 नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, कोणताही व्यक्ती पोलीस, CBI, ED किंवा न्यायालयाचा अधिकारी असल्याचे सांगून फोन किंवा व्हिडिओ कॉलवर “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत फोनवरून पैसे ट्रान्सफर करू नयेत. अशा प्रकारची फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी, असेही पोलीसांनी सांगितले आहे.
अज्ञात व्यक्तींना OTP, बँक तपशील किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये. सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये त्वरित तक्रार दिल्यास संबंधित बँक खात्यांवर कारवाई करून रक्कम गोठविणे शक्य होते, अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिली.




