न्याय की वेळकाढूपणा? वरवंड आत्महत्या प्रकरणात पोलीस भूमिकेवर तीव्र चर्चा..!
🔥MK NEWS36
वरवंड आत्महत्या प्रकरण : तपासाच्या संथ गतीवर गंभीर प्रश्न, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची नागरिकांची मागणी..!
(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)
वरवंड:
वरवंड येथील आत्महत्या प्रकरणात दिवसागणिक नवनवे खुलासे समोर येत असताना, आता या प्रकरणातील सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे पोलीस प्रशासनाची संथ आणि उदासीन भूमिका असल्याची तीव्र चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. संबंधित तरुण-तरुणीतील वाद, त्यामागील कारणे आणि घटना घडण्याआधीचे सर्व पैलू समोर येऊनही, दीड ते दोन महिने उलटूनही गुन्हा दाखल न होणे ही बाब अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे.
या प्रकरणात फिर्यादी होण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती व पुरावे उपलब्ध असतानाही, पोलीस स्वतःहून (सुओ मोटो) गुन्हा दाखल का करत नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. तपास इतक्या संथ गतीने का सुरू आहे, यामागे प्रशासनाचा मनाचा कल बदलतो आहे का, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे, ज्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे तो तरुण आजही राजरोसपणे परिसरात फिरत आहे. अद्याप त्याला चौकशीसाठी अधिकृतरीत्या बोलावण्यात आले नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जर येत्या काळात हा संशयित तरुण फरार झाला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासनावरच राहील, असे मत नागरिकांमध्ये ठामपणे व्यक्त केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर, डीवायएसपी तसेच अॅडिशनल एसपी यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी होत आहे. स्थानिक पोलीस पातळीवर तपास होत असला तरी त्यामध्ये ठोस प्रगती न झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाशिवाय न्याय मिळणे कठीण असल्याची भावना वाढत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, जर वेळेत गुन्हा दाखल झाला असता, तर संशयितावर कायदेशीर कारवाई झाली असती आणि तो फरार होण्याची शक्यताच निर्माण झाली नसती. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने, न्यायप्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
आता येणाऱ्या काळात पोलीस प्रशासन या प्रकरणात ठोस पावले उचलते का, संशयिताला चौकशीसाठी बोलावले जाते का, की पुन्हा वेळकाढूपणा सुरू राहतो—याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून आहे.
न्याय मिळणार की प्रकरण दडपले जाणार, हा प्रश्न आज वरवंडच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे.




