ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी बानपा समोर युवा पँथरचे अमरण उपोषण..!


🔥MK NEWS36 

कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी बानपा समोर युवा पँथरचे अमरण उपोषण
बारामती | प्रतिनिधी
बारामती नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन व मूलभूत सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी भारतीय युवा पँथर संघटना व जनशक्ती कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून बारामती नगर परिषद (बानपा) कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी दिली.
बारामती नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत भारतीय युवा पँथर संघटना व कंत्राटी कर्मचारी प्रतिनिधींनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना यापूर्वी निवेदन सादर केले असून, तरीही प्रशासनाकडून अपेक्षित दखल न घेतल्याने उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे.
पी.एफ. (PF), ईएसआयएस (ESIS) भरून त्यांचे क्रमांक/कार्ड देण्यात यावेत.
संपूर्ण वेतन बँक खात्यावर जमा करावे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात यावा.
कामासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे.
दर तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी करावी.
साप्ताहिक सुट्टी देण्यात यावी.
कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा उतरवावा.
कामावरून कमी केलेल्या व वेतन थकीत असलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ वेतन अदा करावे.
सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावे.
बारामती शहर स्वच्छतेचे काम करणारे स्वच्छतादूत व इतर विभागांतील कंत्राटी कर्मचारी हे शहराच्या दैनंदिन कामकाजाचा कणा असून, त्यांना मूलभूत हक्क व सुविधा मिळणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बारामतीत मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली असून, त्या विकासकामांची देखभाल व स्वच्छतेसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका आहे, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडणे हा त्यांचा संवैधानिक अधिकार असून, केवळ मागण्या मांडल्यामुळे त्यांना विनाकारण कामावरून कमी करण्यात येऊ नये, अशी मागणी संघटनांनी केली आहे. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी कंत्राटी कर्मचारी प्रतिनिधी आकाश शिंदे, विजय म्हस्के, ऋषी तोरणे, योगेश तोरणे, निखिल सरोदे, संतोष भट, रवींद्र मोरे, शिवाजी जाधव, गणेश गोरे, किरण अडागळे आदी उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!