ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

नववर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रसंत आचार्य प्रणाम सागर महाराज यांचे ‘सर्वधर्म सुखाय’ २४ तासांचे अनुष्ठान..!


🔥MK NEWS36

यवत प्रतिनिधी | दि. ३०
नववर्षाच्या पूर्वसंध्येला समाजात शांती, सद्भावना आणि नैतिकतेचा संदेश देण्यासाठी राष्ट्रसंत आचार्य प्रणाम सागर महाराज यांच्याकडून ‘सर्वधर्म सुखाय’ २४ तासांचे विशेष अनुष्ठान आयोजित करण्यात आले आहे. हे अनुष्ठान भांडगाव (यवत, ता. दौंड) येथील भक्तांभर कलश तीर्थ येथे संपन्न होणार आहे.
महाराजांच्या माहितीनुसार, हे अनुष्ठान मंगळवार दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता सुरू होऊन बुधवार दि. १ जानेवारी रोजी सकाळी ५.३० वाजेपर्यंत अखंडपणे चालणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी भौतिक आनंदोत्सवांपेक्षा आध्यात्मिक साधनेला प्राधान्य द्यावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे.
या अनुष्ठानात विश्वशांतीच्या कामनेसाठी ‘विश्वशांती धारा’सह विविध धार्मिक व आध्यात्मिक साधना करण्यात येणार आहेत. यावेळी बोलताना राष्ट्रसंत आचार्य प्रणाम सागर महाराज म्हणाले, “भारतीय नागरिकांनी भौतिकतावादी होण्यापेक्षा संस्कृतीवादी बनणे अधिक आवश्यक आहे. भारतीय संस्कृती ही संयम, करुणा व सदाचारावर आधारित असून याच मूल्यांमुळे समाजात शांतता नांदू शकते.”
“अंत भला तो सब भला” या उक्तीप्रमाणे वर्षाची सांगता २४ तासांच्या साधनेने करून नववर्षाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने व्हावी, हा या अनुष्ठानाचा मुख्य उद्देश असल्याचे महाराजांनी स्पष्ट केले. वर्षभरातील चुकांची व पापांची आत्मशुद्धी करण्यासाठी हे अनुष्ठान उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या साधनेतून सर्वधर्म सुखाय, उत्तम आरोग्य, कुटुंबातील एकता, सामाजिक सलोखा, व्यसनमुक्त भारत, शाकाहाराचा स्वीकार, सदाचार आणि नैतिक जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश देण्यात येणार आहे.
या अनुष्ठानासाठी परिसरासह दूरदूरच्या भागातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून, नववर्षाच्या प्रारंभी संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार आहे.


Translate »
error: Content is protected !!