ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

दौंड शुगरच्या वाहन चालकांना आवर घाला बोरीबेल गाव सकाळपासून अंधारात; एमएसबीचे खांब उद्ध्वस्त, शेतकऱ्यांचे ऊसाचे मोठे नुकसान..!


🔥MK NEWS36

दौंड शुगरच्या वाहन चालकांना आवर घाला

बोरीबेल गाव सकाळपासून अंधारात; एमएसबीचे खांब उद्ध्वस्त, शेतकऱ्यांचे ऊसाचे मोठे नुकसान

सचिन आटोळे
दौंड प्रतिनिधी

दौंड शुगर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांच्या बेफिकीर आणि जीवघेण्या वाहनचालना मुळे बोरीबेल गावाला मोठा फटका बसला आहे. रावणगाव ते दौंड शुगर दरम्यान उसाची वाहतूक करताना झालेल्या अपघातात महावितरण (एमएसबी) चे विद्युत खांब व लाईट तोडले गेल्याने बोरीबेल गाव सकाळपासून विजेविना आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रॉली चालक वेगावर नियंत्रण न ठेवता, गाण्याच्या मोठ्या आवाजात आणि काही वेळा नशेच्या अवस्थेत वाहन चालवत आहेत. घाट परिसरात उतार-चढावाचे भान न ठेवता ही वाहने चालवली जात असल्याने वारंवार अपघात होत आहेत. या अपघातांमुळे शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान होत असून टनात मोठी घट नोंदवली जात आहे.

अपघातात रस्त्यावर सांडलेला ऊस पुन्हा ट्रॉलीत भरून घेण्यासाठी ऊसतोड कामगारांना मोफत राबावे लागत असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराकडे कारखाना प्रशासन आणि संबंधित यंत्रणा गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

विशेष बाब म्हणजे हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असतानाही, वाहन चालकांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ तोंडी सूचना देऊन वेळ मारून नेण्याचे प्रकार सुरू असल्याने अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही.

दरम्यान, या वाहन चालकांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र, ट्रॅक्टर व ट्रॉलीची नोंदणी आणि वाहनांची जुनी अवस्था यांची सखोल तपासणी करण्याची गरज असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात लवकरच बारामती आरटीओ आणि दौंड पोलीस स्टेशनला लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

अपघातास कारणीभूत वाहन चालकावर तात्काळ गुन्हा दाखल करून, महावितरणच्या नुकसानग्रस्त विद्युत खांब व लाईटची संपूर्ण भरपाई त्याच्याकडून वसूल करावी, भरपाई दिल्याशिवाय वाहन सोडू नये तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधित चालकांना ताब्यात घेऊन कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी बोरीबेलसह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.


Translate »
error: Content is protected !!