पसंती क्रमांकाचा वाढता क्रेझ; बारामती परिवहन कार्यालयात ११ कोटींचा महसूल..!
🔥MK NEWS36
पसंती क्रमांकाद्वारे ११ कोटी रुपयांहून अधिक महसूल जमा
— बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती..!
बारामती|प्रतिनिधी दि. ६ : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वाहनांसाठी पसंती क्रमांक घेण्याकडे नागरिकांचा वाढता कल दिसून येत असून, यामधून तब्बल ११ कोटी १ लाख रुपयांचा महसूल जमा झाल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली.
जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एकूण १० हजार २६८ अर्ज पसंती क्रमांकाकरिता स्वीकृत झाले. यामध्ये २०२४ या वर्षात ४ हजार ९१९ अर्जांमधून ४ कोटी १८ लाख, तर २०२५ या वर्षात ५ हजार ३४९ अर्जांमधून ६ कोटी ८३ लाख रुपये महसूल प्राप्त झाला आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात पसंती क्रमांकाच्या महसुलात सुमारे ६३ टक्क्यांची वाढ, तसेच वाहन क्रमांक वाटपाच्या संख्येत सुमारे ९ टक्क्यांची वाढ झाल्याचेही निकम यांनी स्पष्ट केले.
नागरिकांचा वाढता प्रतिसाद, सेवा सुलभीकरण, पारदर्शक प्रक्रिया आणि विभागातील कार्यक्षम अंमलबजावणीमुळे महसुलात ही लक्षणीय वाढ झाल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.




