ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“हरिकृपा नगरला १३ वर्ष रस्ता नाही; अजित दादांचा विकास कुठे गेला?”


🔥MK NEWS 36 संपादकीय 

हरिकृपा नगर सोसायटीला १३ वर्षांपासून रस्ता व स्ट्रीट लाईट नाही; अजित दादांच्या विकासाचा सवाल?

Baramati –

बारामती म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर स्वच्छ, सुंदर व सर्व सोयी-सुविधांनी सज्ज असं शहर उभं राहतं. पण बारामतीच्या मध्यवर्ती भागातील नटराज सोसायटी ते महादेव मंदिर परिसर आजही विकासापासून वंचित आहे. हरिकृपा नगर सोसायटीला तब्बल १३ वर्षे झाली तरीही पक्क्या रस्त्याचा व स्ट्रीट लाईटचा साधा लाभ मिळालेला नाही.

या भागात उच्चशिक्षित नागरिक, पोलीस कर्मचारी व नगरसेवकसुद्धा राहतात. तरीदेखील रस्ता व दिव्यांचा प्रश्न कायम आहे. नागरिक घरपट्टी व पाणीपट्टी नियमित भरत असले तरी त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे “बारामतीचा विकास नेमका कुठे गेला?” हा सवाल स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी अर्ज देऊनही काहीच कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांचं म्हणणं आहे की, “बारामतीच्या विकासाचं चित्र बाहेरून दाखवायला भिगवण रोड झगमगता दाखवला जातो. पण नटराज सोसायटीकडे आलं की खेड्यात आल्यासारखं वाटतं. तेरा वर्षे रस्ताच झालेला नाही, दिवे नाहीत, हीच खरी वस्तुस्थिती आहे.”

आजवरच्या राजकीय सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नाकडे केवळ देखावा करण्यापुरतं लक्ष दिलं आहे, असंही नागरिकांचं मत आहे. “जर हा रस्ता व लाईट तातडीने झाला नाही तर आम्ही पुढील काळात तीव्र आंदोलन करू,” असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

बारामतीत सर्वत्र “अजित दादांचा विकास” म्हणून चर्चा केली जाते. पण नटराज सोसायटी ते महादेव मंदिर परिसरातील मूलभूत प्रश्न १३ वर्षे सुटलेला नसल्याने, या विकासाची खरी व्याख्या काय आणि नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे सुविधा कधी मिळणार? हा प्रश्न आज गंभीरपणे उपस्थित झाला आहे.


Translate »
error: Content is protected !!