जंगची कन्येसाठी जंगी राजकीय खेळी, 13 प्रभागात स्वतंत्र प्रचार यंत्रणा कार्यान्वित..!
🔥MK NEWS36
जंगची कन्येसाठी जंगी राजकीय खेळी; 13 प्रभागांत स्वतंत्र प्रचार यंत्रणा कार्यान्वित
सचिन आटोळे – विशेष राजकीय प्रतिनिधी, दौंड
दौंड महानगरपालिका निवडणुकीत मागील वेळी झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जंग साहेबांनी यंदाच्या निवडणुकीत भल्यामोठ्या राजकीय रणनीतीची आखणी केली आहे. 13 प्रभागांमध्ये अत्यंत भक्कम, स्वतंत्र आणि काटेकोर अशी प्रचार यंत्रणा सुरू करण्यात आली असून, एकही घर मतदानापासून वंचित राहू नये यासाठी दृढनिश्चयाने मोर्चेबांधणी करण्यात आली आहे.
मागील निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतर कोणत्या पातळीवर चुका झाल्या, कोण फसवले, दगा नेमका कुठे झाला याचा सखोल अभ्यास जंग साहेबांनी मागील पाच वर्षांत केला. त्या निवडणुकीत उमेदवारी पक्षाची असल्याने निष्ठेने काम केले तरी अपेक्षेच्या वेळी झालेला फटका त्यांनी लक्षात ठेवला. यावेळी तशाच परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जालीम उपाययोजना आखत 13 प्रभाग स्वतंत्रपणे कार्यान्वित केले आहेत.
या व्यापक मोहिमेत माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह जंग साहेबांचे दोन पुत्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते दिवसरात्र प्रचारात झोकून देत आहेत. प्रत्येक नेत्याला स्वतंत्र जबाबदारी सोपवण्यात आली असून शहरातील कोणतेही घर हुकू नये, मतदारांचे प्रश्न तत्काळ सोडवावे, नाराज कार्यकर्ते विश्वासात घ्यावेत अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
बाहेरगावच्या मतदारांना संपर्क करून मतदानासाठी उपस्थित राहण्याचे आवाहनदेखील जंग साहेबांनी केले आहे. तसेच, कोण नाराज आहे, कोण विरोधात काम करतोय, कोणती मागील वर्षांची कामे प्रलंबित आहेत याचा स्वतंत्र अभ्यास करून त्यांच्याशी संवाद साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नवखा उमेदवार असला तरी शहराच्या विकासासाठी ‘मशाल’ ठरेल, असा आत्मविश्वास जंग साहेबांनी व्यक्त केला आहे. तरुण, हुशार नेतृत्वाची निवड ही राष्ट्रवादीची सक्षम चाल असून विरोधकांना घेरण्याचा हा धोरणात्मक डाव असल्याचे जाणकारांचे मत आहे.
मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक कार्यकर्ता सतर्क राहावा, सुट्ट्या घ्याव्यात, रजा घ्यावी, परंतु प्रचारात कोणतीही कसर राहू नये असा जंग साहेबांचा दमदार संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र प्रतिनिधी, मतदार यादीची छाननी, विरोधकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष ‘वॉच सिस्टिम’ उभी करण्यात आली असून ती प्रभावीपणे कार्यरत असल्याची माहिती मिळते.
अशी जंगी, सुनियोजित आणि बहुआयामी प्रचार मोहीम राबवणे जंग साहेबांच्याच जोरावर शक्य असल्याचे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.




