बारामती तालुका पोलिसांचे यश — बेकायदेशीर हत्यारे जप्त, आरोपी तुरुंगात..!
🔥MK NEWS 36
📰 बारामती तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई : तलवार व लोखंडी कोयता बाळगणारा आरोपी जेरबंद
बारामती तालुका |प्रतिनिधी
बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने एमआयडीसी परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या इसमाला अटक करून शस्त्रांसह ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई मा. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. ४३२/२०२५ भा.दं.सं. कलम १९(४)(२) नुसार दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, समर्थ सिद्दू मल्हारे (रा. मालुसरेवस्ती, वंजारवाडी, ता. बारामती, जि. पुणे) हा इसम दहशत निर्माण करण्यासाठी तलवार बाळगत आहे.
प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत, एमआयडीसी बारामती येथील श्रायबर डायनामिक्स डेअरी परिसरात छापा टाकला. या ठिकाणी आरोपी समर्थ मल्हारे यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने तलवार आपल्या राहत्या घरी ठेवली असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या घरी झडती घेतल्यावर तेथे एक तलवार व एक लोखंडी कोयता आढळून आला.
त्यास तत्काळ शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४२४/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. श्री. संदीपसिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), मा. श्री. गणेश बिरादार (अप्पर पोलीस अधीक्षक) आणि मा. श्री. सुदर्शन राठोड (उपविभागीय अधिकारी, बारामती) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिंगाडे, तसेच पोलीस अंमलदार बिडवे, वीर, वाकळे, दराडे, खाडे, सोनवलकर यांनी मिळून केली.
बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.




