ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

बारामती पोलिसांची मोठी कारवाई; ६३४ किलो गांजासह सात आरोपी जेरबंद..!


🔥MK NEWS36

बारामतीत आंतरराज्यीय गांजा तस्करी रॅकेट उद्ध्वस्त; सात आरोपी जेरबंद, तीन कोटींचा मुद्देमाल जप्त

बारामती : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरराज्यीय गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सात आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल ६३४ किलो गांजा, दोन इनोव्हा कार आणि इतर असा सुमारे ३ कोटी ३ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भारत सरकारच्या “नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान जळोची-पंपळी रोड परिसरातील शेतात प्लास्टिक ड्रममध्ये लपवून ठेवलेला सुमारे ४७८ किलो गांजा आढळून आला होता.

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांच्या स्वतंत्र पथकांकडून सुरू करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे समाधान गायकवाड आणि विकी ऊर्फ पप्पू कांबळे यांच्यावर संशय निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी तांदुळवाडी परिसरातून प्रकाश ऊर्फ पक्या काटे, समाधान गायकवाड, प्रिन्सकुमार सिंग आणि राहुल गोरे यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी छत्तीसगड येथून गांजा आणून साठवून ठेवल्याची कबुली दिली.

तपासादरम्यान विकी कांबळे, संग्राम ऊर्फ चंदन सिंग आणि जॉकी माझी हे दोन इनोव्हा कारमधून बारामतीकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाठलाग सुरू केला. एका वाहनाचा माग काढताना सांगली स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेण्यात आली. एमएच ०२ सीझेड ०२०२ क्रमांकाच्या इनोव्हा कारमधून १२४ किलो गांजा जप्त करण्यात आला आणि विकी कांबळे याला ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, दुसऱ्या पथकाने फलटण रोडवरील गवारे चौक येथे दुसरी इनोव्हा कार अडवून त्यामधून २३ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत हुसैन लष्कर, आदित्य शिंदे आणि युवराज दुगे यांना अटक करण्यात आली.

प्राथमिक तपासात आरोपी छत्तीसगडमधून गांजा आणून पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अवैध विक्रेत्यांना पुरवठा करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईमुळे मोठे आंतरराज्यीय गांजा तस्करी रॅकेट उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.


Translate »
error: Content is protected !!