अखेर रडत खडत 24 तासानंतर वीज अंधारीत गावांना गणपती विसर्जनाच्या एक तास अगोदर मिळाली ..
🔥MK NEWS 36
अखेर रावणगाव फीडरवरील २४ तासानंतर वीजपुरवठा सुरळीत
सचिन आटोळे,
(दौंड विशेष प्रतिनिधी)
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अंधारात बुडालेल्या रावणगाव फीडरवरील गावांना अखेर २४ तासांच्या खडतर प्रयत्नांनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. विसर्जनाच्या अवघ्या एका तास अगोदर वीज परत आल्याने ग्रामस्थांनी दिलासा व्यक्त केला.
एमएसईबीच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य अभियंता मा.श्री. पेठकर, अधीक्षक अभियंता मा.श्री. लहामगे, केडगावचे कार्यकारी अभियंता श्री. आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली व दौंडचे कार्यकारी अभियंता श्री. गणनवरे यांच्या सहकार्याने तसेच कुरकुंभ शाखेचे सहाय्यक अभियंता श्री. पी. ए. मुंगसे यांच्या उपस्थितीत हे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.
काल रात्री ३३ केव्ही रावणगाव फीडरची अंडरग्राउंड केबल फॉल्ट झाल्याने समस्या निर्माण झाली. स्पेअर केबल चार्ज केल्यानंतर फीडर काही मिनिटे चालू राहिला मात्र पुन्हा फॉल्ट झाला. त्यानंतर ग्रीन लीफ पॉवर सोल्युशनचे प्रशांत रणवरे यांनी केबल टेस्टिंग गाडी व जॉईन्डर टीम तातडीने बोलावून २२०/३३ केव्ही भिगवण सबस्टेशन ते मानकर डोसा या २ कि.मी. अंतरात तपासणी केली. यातून ४ फॉल्ट सापडले व ५ हाय प्रेशर टेस्ट घेण्यात आल्या.
त्यानंतर जेसीबीच्या साह्याने केबल उकरून जॉईन्ट लावण्यात आले. या दरम्यान, केबल भिगवण-राशीन रोडवरील डांबरीच्या आत असल्यामुळे पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांकडून व शेतकऱ्यांकडून काही अडचणी निर्माण झाल्या. सरपंच पराग जाधव (भिगवण) व मच्छिंद्र मदने (स्वामी चिंचोली) यांच्या मध्यस्थीने प्रश्न मार्गी लावण्यात आले.
या कामासाठी श्रीशिरसाई इलेक्ट्रिकल्सचे अरुण आटोळे यांनी सबस्टेशन ते रावणगाव लाईनवर ट्री कटिंगचे काम केले. कुरकुंभ शाखेचे लाईनमन वैभव कुमार काळे, वरिष्ठ तंत्रज्ञ प्रवीण ढवळे, नामदेव गावडे, नितीन मेंगावडे तसेच रणवरे यांच्या टीमने परिश्रम घेतले.
युद्धपातळीवर प्रयत्न करून अखेर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीच्या वेळी गावांमध्ये दिवाळखरी उजळली. ग्रामस्थ व स्थानिक मंडळांनी या कार्यात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.



