ग्रामपंचायतींच्या गैरव्यवहाराविरोधात तरुणाचा आवाज बुलंद – 27 मागण्या मान्य न झाल्यास उपोषण..!
🔥MK NEWS 36 संपादकीय
📰 दौंड तालुक्यातील तरुणाचा आमरण उपोषणाचा इशारा; ग्रामपंचायतींच्या भ्रष्टाचाराविरोधात 27 मागण्या
दौंड (प्रतिनिधी कोमल सोनवणे)
दौंड तालुक्यातील ग्रामपंचायतींतील भ्रष्टाचार, अपूर्ण विकासकामे, तसेच प्रशासनाच्या निष्काळजी वृत्तीला कंटाळून खडकी (ता. दौंड) येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल अशोक शिंदे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
शिंदे यांनी 29 सप्टेंबर 2025 पासून दौंड पोलीस स्टेशनसमोर उपोषण सुरू करण्याचे जाहीर केले असून त्याबाबतचा लेखी अर्ज मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी पुणे, पंचायत समिती दौंड तसेच स्थानिक पोलीस प्रशासन यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या
शिंदे यांनी 27 मागण्या सादर केल्या असून त्यात खडकी ग्रामपंचायत व खानोटा ग्रामपंचायतींच्या विविध गैरव्यवहार व बेफिकिरीचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. त्यापैकी काही महत्वाच्या मागण्या पुढीलप्रमाणे –
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून रहदारीसाठी खुला करावा व सुशोभीकरण करावे.
2. खडकी येथील संविधान भवनासाठी जागा उपलब्ध करून त्वरित बांधकाम सुरू करावे.
3. खानोटा ग्रामपंचायतीने प्रजासत्ताक दिन न साजरा केल्याबद्दल जबाबदारांवर गुन्हे दाखल करावेत.
4. बौद्ध समाज मंदिराचा बेकायदेशीर वापर थांबवून ग्रामपंचायतीकडून नुकसानभरपाई वसूल करावी.
5. मागासवर्गीय निधीचा अपहार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी.
6. शासन निर्णयांचे उल्लंघन करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करावी.
7. खानोटा येथील शेततळे पुन्हा तयार करून अतिक्रमण हटवावे.
8. दौंड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करावी.
9. संगणक परीचालक पदावरून कमी करण्याचा कट रचून झालेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळावा व मानधन दिले जावे.
10. खडकी येथे दरडोई 40 लिटर पाणीपुरवठा नियमित करण्यात यावा.
11. दौंड तालुक्यातील कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे सुरू करण्यात यावे.
12. तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करून निलंबन करावे.
13. खडकी ग्रामपंचायतीतील वृक्ष संवर्धन व लागवड निधी अपहार प्रकरणी गुन्हे दाखल करावेत.
14. आ.रो. फिल्टरचे स्मार्ट कार्ड सर्व नागरिकांना वाटप करण्यात यावे व वसूल केलेल्या पैशाचा हिशेब सार्वजनिक करावा.
15. अंगणवाडीचे लाईट बिल तातडीने भरून वीजपुरवठा सुरू करण्यात यावा.
16. जिल्हा परिषद शाळा व हायस्कूल येथील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यात यावेत.
17. बाजार जाळे भूसंपादन निधीच्या अपहार प्रकरणी जबाबदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
“न्याय न मिळाल्यास जबाबदार प्रशासन” – शिंदे
“आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मी आमरण उपोषणाला बसणार आहे. यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी शासन व स्थानिक प्रशासन जबाबदार राहील,” असा इशारा विशाल शिंदे यांनी दिला आहे.
उपोषणाकडे सर्वांचे लक्ष
शिंदे यांनी मांडलेल्या मागण्या या थेट ग्रामपंचायत व पंचायत समितींच्या कामकाजातील त्रुटींशी संबंधित असल्यामुळे दौंड तालुक्यात या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये या मुद्द्यांबाबत तीव्र नाराजी असून प्रशासनाची प्रतिक्रिया काय असणार याकडे उत्सुकता आहे.




