ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

बारामतीत ‘टर्मिन’ इंजेक्शन रॅकेटवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; १०० इंजेक्शनसह तरुणाला बेड्या!


🔥MK NEWS36 

बारामतीत ‘टर्मिन’ इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांची मोठी कारवाई

१०० बेकायदेशीर इंजेक्शन्ससह २४ वर्षीय तरुणाला अटक; जिम आणि शरीरसौष्ठवाच्या नावाखाली सुरू होता तरुणांच्या जीवाशी खेळ.

बारामती:

तरुणांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि बेकायदेशीर औषध विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटवर बारामती शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा (LCB) यांनी संयुक्त कारवाई करत मोठा प्रहार केला आहे. शरीरसौष्ठवासाठी (Bodybuilding) घातक ठरू शकणाऱ्या ‘टर्मिन’ (Mephentermine Sulphate) या प्रतिबंधित इंजेक्शनचा १०० बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी गौरव बाळासो जाधव (वय २४, रा. आमराई, बारामती) याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

💢गुप्त माहितीवरून रचला सापळा

मिळालेल्या माहितीनुसार, २३ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला बातमी मिळाली होती की, बारामती शहरातील एम.ई.सी.बी. (MECB) कार्यालय परिसरातील सर्व्हिस रोडवर एक इसम संशयास्पदरीत्या इंजेक्शनचा साठा घेऊन विक्रीसाठी येणार आहे. या माहितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने सापळा रचला. यावेळी एमएच ४२ एडब्ल्यू ९२६० या क्रमांकाच्या अ‍ॅक्टिव्हा स्कुटीवर बसलेल्या संशयित गौरव जाधव याची झडती घेतली असता, स्कुटीच्या डिकीत खाकी बॉक्समध्ये १०० नगांचा ‘टर्मिन’ इंजेक्शनचा साठा आढळून आला.

🎈जीवाशी खेळ: ५०० रुपयांना एक इंजेक्शन

आरोपीकडे या औषधांच्या खरेदीचा कोणताही परवाना किंवा डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन मिळून आले नाही. जिममध्ये व्यायाम करणाऱ्या तरुणांना शरीर क्षमता आणि ताकद वाढविण्याचे आमिष दाखवून, हा आरोपी प्रति बाटली सुमारे ५०० रुपयांना या इंजेक्शनची विक्री करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी ३३,४०० रुपये किमतीची इंजेक्शन्स आणि ५०,००० रुपयांची स्कुटी असा एकूण ८३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

👍वैद्यकीय इशारा: काय आहेत धोके?

औषध निरीक्षक सचिन बुगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मेफेन्टरमाइन सल्फेट’ हे औषध ‘Schedule-H’ प्रवर्गात येते. याचा मूळ वापर कमी रक्तदाबाच्या रुग्णांसाठी केला जातो. मात्र, जिममध्ये याचा गैरवापर केल्यास:

📍हृदयाचे ठोके मंदावणे (Slow Heart Rate)

📍भ्रम होणे (Hallucinations)

📍झटके येणे (Convulsions)

📍शुद्ध हरपणे

यांसारखे गंभीर आणि प्रसंगी जीवघेणे परिणाम होऊ शकतात.

🚨कारवाई करणारे पथक

ही धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व बारामती शहरचे निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पीएसआय कारंडे, स्वप्नील अहिवळे, अजय घुले, निलेश शिंदे आणि शहर पोलिसांच्या पथकाचा समावेश होता.

✅पोलिसांचे आवाहन:

“तरुणांनी शरीर कमावण्याच्या नादात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही इंजेक्शन किंवा स्टेरॉइड्सचा वापर करू नये. पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे. अशा प्रकारच्या अवैध विक्रीबाबत माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.”


Translate »
error: Content is protected !!