“ढोल-ताशा व डॉल्बीच्या गजरात बाळूमामा पालखीची भव्य मिरवणूक”
🔥MK NEWS36
निरवांगीत बाळूमामा भंडारा उत्सव उत्साहात; अडीच टन भंडाऱ्याची उधळण..
निरवांगी (ता. इंदापूर) | प्रतिनिधी – सागर समिंदर
निरवांगी येथे रविवारी (दि. 22/03/2026) मोठ्या उत्साहात श्री संत सद्गुरु बाळूमामा भंडारा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित भव्य पालखी मिरवणुकीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
या मिरवणुकीत तब्बल अडीच टन भंडारा उधळण्यात आला असून संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. गजी, ढोल-ताशांचा गजर आणि डॉल्बी सिस्टीमच्या निनादात बाळूमामांच्या पालखीची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक पार पडत असताना भाविकांनी ठिकठिकाणी स्वागत करून दर्शन घेतले.

मिरवणुकीनंतर सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत ह.भ.प. अभिजीत महाराज शास्त्री यांचे बाळूमामा चरित्रावर आधारित सुश्राव्य कीर्तन झाले. कीर्तनातून बाळूमामांच्या जीवनकार्याचा वेध घेत भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यात आले. कीर्तनानंतर बाळूमामांची आरती करून उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, भंडारा उत्सवानिमित्त उद्या सोमवार (दि. 23/03/2026) रात्री ८ वाजता भारूड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ह.भ.प. संतोष महाराज पुजारी (कडवेकर) व सहकलाकार आपल्या सादरीकरणातून उपस्थितांना भक्तिरसाचा अनुभव देणार आहेत.
या संपूर्ण कार्यक्रमामुळे निरवांगी परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले असून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.




