ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

स्वच्छ बारामतीसाठी राबणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी जनशक्ती संघ आक्रमक..!


🔥MK NEWS36 

स्वच्छ बारामतीत कंत्राटी कामगारांचा मोठा वाटा; हक्कांसाठी जनशक्ती संघ आक्रमक

बारामती, दि. १५ : बारामती नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, त्यांच्या मूलभूत हक्कांकडे प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने करण्यात आला. संघाच्या बैठकीत कामगारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

नगर परिषद क्षेत्र स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कंत्राटी कामगार दिवस-रात्र मेहनत घेत असताना त्यांना अत्यल्प वेतन, असुरक्षित कामाचे वातावरण आणि विविध नियमांच्या बंधनांना सामोरे जावे लागत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. कामाचा ताण अधिक असूनही कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.

“कंत्राटी कामगार हे देखील बारामतीचे नागरिक आणि मतदार आहेत. मात्र त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत. कामगारांच्या श्रमाचा योग्य मोबदला न देता ठेकेदारांना फायदा होत असेल, तर ही पद्धत चुकीची आहे. यात बदल होणे आवश्यक आहे,” असे मत जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी व्यक्त केले.

बैठकीत कंत्राटी कामगारांना किमान वेतन लागू करणे, महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नियमित पगार देणे, तसेच पी.एफ. व ईएसआयएसच्या सुविधा लागू करण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच काही तांत्रिक व प्रशासकीय बाबींवरही चर्चा झाली.

बारामती शहर स्वच्छ ठेवण्यात कंत्राटी कामगारांचा मोठा वाटा असूनही त्यांना योग्य सन्मान मिळत नसल्याची भावना उपस्थित कामगारांनी व्यक्त केली. “कामगारांची होणारी पिळवणूक थांबलीच पाहिजे. त्यांच्या हक्कांसाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघ संघर्ष करणार आहे,” असा इशारा गौरव अहिवळे यांनी दिला.


Translate »
error: Content is protected !!