ग्रामसचिव म्हणून अंगणवाडी सेविकेला जबाबदारी; प्रक्रियेअभावी निरवांगी ग्रामसभा तहकूब
🔥MK NEWS36
ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे निरवांगी ग्रामसभा पुन्हा तहकूब
५२ ग्रामस्थांनी सभा घेण्यास नकार; ग्रामसेवक उपस्थित असतानाच नव्याने ग्रामसभा घेण्याची मागणी
निरवांगी : प्रतिनिधी सागर समिंदर
निरवांगी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेण्याच्या नियोजित प्रक्रियेला ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा अडथळा निर्माण झाला. ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहकूब ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, ग्रामसेवक संपावर असल्याने ग्रामसेवक उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे उपस्थित ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

यापूर्वी २९ मे २०२६ रोजी शनिवारी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी ग्रामसेवक उपस्थित नसल्याने तसेच ग्रामसभेसाठी आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने सभा तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी तहकूब सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले.
मात्र, या दिवशीही ग्रामसेवक संपामुळे अनुपस्थित असल्याने ग्रामसचिव म्हणून अंगणवाडी सेविकेला ग्रामसभा घेण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले. मात्र, ग्रामसभेच्या कामकाजाची प्रक्रिया, प्रोसिडिंग लेखन तसेच त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उपस्थित ५२ ग्रामस्थांनी ग्रामसभा घेण्यास नकार दिला.
ग्रामसेवक ज्या दिवशी उपस्थित असतील, त्याच दिवशी ग्रामसभेची नवीन तारीख निश्चित करावी. तसेच ग्रामसभेची माहिती स्पीकरद्वारे गावातील सर्व ग्रामस्थांना देऊन नियमानुसार ग्रामसभा घ्यावी, अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली.
या ग्रामसभेत प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल) योजनेतील लाभार्थ्यांची यादी निश्चित करून पात्र लाभार्थ्यांची निवड करणे, तसेच महसूल मंत्री बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर करण्यात आलेली अतिक्रमणे कायम करण्यासंदर्भातील लाभार्थ्यांची निवड असे महत्त्वाचे विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. मात्र, ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे हे विषय मंजूर करून त्याबाबतचे प्रोसिडिंग पूर्ण करता आले नाही.
आता ग्रामसभा पुढील कोणत्या तारखेला घेण्यात येणार आणि घरकुल तसेच अतिक्रमणधारक लाभार्थ्यांची यादी कधी प्रसिद्ध करून निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार, याबाबतचा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या वेळी प्रशासक सरपंच सौ. सुरेखा चांगदेव गुरव, पोलीस पाटील, आजी-माजी सदस्य, सरपंच-उपसरपंच तसेच महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




