क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

“बारामतीत हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अवैध भट्ट्यांचा नायनाट”


🔥MK NEWS36 

बारामतीत हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अवैध धंद्यांवर करारी कारवाई

बारामती : अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर आळा घालण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी व्यापक आणि नियोजनबद्ध मोहीम राबवत सलग धडक कारवाया केल्या आहेत. या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे.

पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गुप्त माहितीच्या आधारे गुणवडी, बांदलवाडी, आमराई या भागांत एकाचवेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईदरम्यान गावठी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे ड्रम, भांडी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच मोठ्या प्रमाणावर तयार दारू हस्तगत करून ती जागीच नष्ट करण्यात आली.

गेल्या चार दिवसांत पोलिसांनी पायी पेट्रोलिंग करत गुणवडी, बांदलवाडी, आमराई, पिंपळी, लिमटेक, कसबा, साठेनगर या भागांतही कारवाया केल्या. यामध्ये घरगुती भट्ट्यांचा नायनाट करत दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारी साधने नष्ट करण्यात आली व अवैध साठ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली.

दरम्यान, पोलिसांनी केवळ कारवाईवर भर न देता सामाजिक बांधिलकीही जपली. गावोगावी जनजागृती मोहीम राबवत महिला वर्गाशी थेट संवाद साधण्यात आला. दारूबंदी कायद्याबाबत मार्गदर्शन करत अवैध दारूमुळे होणारे आरोग्य व सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट करण्यात आले. पारंपरिक दारू व्यवसाय करणाऱ्या महिलांचे समुपदेशन करून त्यांना पर्यायी उपजीविकेकडे वळण्याचे आवाहनही करण्यात आले.

पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी इशारा देताना सांगितले की, “अवैध दारू विक्रीविरोधातील मोहीम सातत्याने सुरू राहील. कोणताही बेकायदेशीर व्यवसाय आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे.”

या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून अवैध धंद्यांना आळा बसेल आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्यासह PSI भंडारे, पो.हवा. यशवंत पवार, रामचंद्र शिंदे, अभिजीत कांबळे, एएसआय संदीप जाधव, महिला पो.शि. सीमा निंबाळकर, राजश्री जगताप, पो.शि. अमोल देवकाते, अक्षय सिताफ, विशाल शिंदे, विजय ओमासे आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.


Translate »
error: Content is protected !!