ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशिक्षणसामाजिक

“खड्ड्यांनी भरलेला पाटस–कानगाव रस्ता : तातडीने दुरुस्ती न झाल्यास १ सप्टेंबरला आंदोलन”


🔥MK NEWS 36 

पाटस-कानगाव रस्त्यावर खड्ड्यांचा प्रश्न तीव्र : १ सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलनाची चेतावणी

सचिन आटोळे
तालुका प्रतिनिधी

दौंड : पाटस–कानगाव रस्त्यावर खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले आहेत. या रस्त्यावरून सिमेंट कंपनीच्या ट्रकद्वारे क्षमतेपेक्षा दुपटीने मालवाहतूक केली जात असल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. परिणामी प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने, जय शिवसंग्राम संघटनेच्या वतीने सोमवार दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव साळुंखे यांनी दिला आहे.

साळुंखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, दौंड यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की –

सिमेंट कंपनीच्या अवजड वाहनांमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

या खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसांत अपघात घडले असून, भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

शालेय विद्यार्थी रोज या रस्त्याने प्रवास करतात. खड्डे चुकवताना त्यांचे जीव धोक्यात येत आहेत.

रस्ता तातडीने दुरुस्त केला नाही तर १ सप्टेंबर रोजी नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या समवेत आंदोलन करण्यात येईल.


स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाला पाठिंबा दर्शवला असून, “रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते. प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात” अशी मागणी व्यक्त केली आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेत रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करावेत, अन्यथा आंदोलन उग्र रूप धारण करेल, असा इशारा जय शिवसंग्राम संघटनेने दिला आहे.


Translate »
error: Content is protected !!