निरवांगीत नीरा नदीपात्र लुटलं जातंय! हायवा गाड्यांनी खुलेआम वाळू तस्करी होते का?
🔥MK NEWS36
“तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील निष्क्रिय? नागरिकांचा संताप उसळला”
इंदापूर प्रतिनिधी : सागर समिंदर
इंदापूर तालुका म्हटलं की कृषीप्रधान ओळख, कष्टकरी शेतकरी आणि नीरा नदीचं जीवनदायी अस्तित्व अशी प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. मात्र अलीकडच्या काळात हीच ओळख पुसट होत चालली असून तालुका आता बेकायदेशीर धंद्यांचा अड्डा बनत चालल्याची गंभीर बाब समोर येत आहे. प्रशासनाच्या ढिलाईमुळे आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अवैध वाळू उत्खनन, मुरूम तस्करी यांसारखे प्रकार उघडपणे सुरू आहेत.
मध्यंतरी तहसीलदारांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर प्रशासन अधिक सतर्क होईल, अवैध धंद्यांवर लगाम बसेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात उलट चित्र पाहायला मिळत आहे. दोन नंबर व्यवसाय करणाऱ्यांची मनगटशाही अधिकच वाढली असून ते खुलेआम कायद्याला हरताळ फासत आहेत.

इंदापूर तालुक्यातील निरवांगी परिसरात हा प्रकार अधिक गंभीर स्वरूपात समोर आला आहे. नीरा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू आणि दगड काढून त्याची खुलेआम वाहतूक केली जात आहे. हायवा गाड्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून बीके-बियन रोडवरील गायरान गट क्रमांक 1/1 येथे अवैध साठा केला जात आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या सुरू असूनही संबंधित यंत्रणा मात्र ‘डोळेझाक’ करत असल्याचे चित्र आहे.
तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील यांसारखे जबाबदार अधिकारी या प्रकाराकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. “हे अधिकारी नेमकं कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असून नदीपात्राची हानी, भूजल पातळी कमी होणे आणि भविष्यातील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मात्र या सर्व प्रकारामुळे हवालदिल झाले असून “आम्ही न्याय कुणाकडे मागायचा?” असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत.
दरम्यान, येणाऱ्या काळात इंदापूर तालुक्यातील अशा बेकायदेशीर व्यवसायांची मालिका उघड करण्याचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.




