शासन निर्णय तात्काळ मागे घ्या, अन्यथा आंदोलन – ओबीसी समाजाचा इशारा..!
🔥MK NEWS 36
ओबीसी आरक्षणावर गदा आणणाऱ्या शासन निर्णयाचा दौंडमध्ये तीव्र विरोध!
कोमल सोनवणे
दौंड (प्रतिनिधी) –
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेला शासन निर्णय (क्र. सबीसी-२०२५/प्र.क्र.२१९/माक) रद्द करण्याची मागणी दौंड तालुक्यातून जोर धरू लागली आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण कृती समिती, दौंड तालुका यांनी तहसिलदार कार्यालयात निवेदन देऊन या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदविला.
सदर शासन निर्णयानुसार, मराठा समाजातील काही व्यक्तींना ‘मराठा-कुणबी’ समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळविण्याचा मार्ग खुला करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजातील ४०० हून अधिक जातींच्या प्रतिनिधित्वावर गदा येणार असून, शिक्षण व नोकरीच्या संधींमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

आमच्या हरकती
घटनात्मक उल्लंघन – अनुच्छेद १५(४) व १६(४) चा भंग.
आधीच मर्यादित संधी असलेल्या ओबीसी घटकांवर अन्याय.
सर्वोच्च न्यायालयीन निर्णयांचे उल्लंघन.
आमच्या मागण्या
शासन निर्णय तात्काळ मागे घ्यावा.
ओबीसी आरक्षणामध्ये अन्याय्य समावेश होऊ नये.
ओबीसी समाजाचे हक्क व आरक्षण संरक्षित राहील असे ठोस धोरण घोषित करावे.
यावेळी वक्त्यांनी इशारा दिला की, शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर ओबीसी समाज लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन उभारेल.




