“नवसाला पावणारे नंदिकेश्वर; भाविकांची साखर अर्पण करून मनोकामना”
🔥MK NEWS36
नीरा नदीकाठी वसलेले प्राचीन श्री नंदिकेश्वर मंदिर; भाविकांची अखंड श्रद्धा
इंदापूर प्रतिनिधी – सागर समिंदर
इंदापूर तालुक्यातील दगडवाडी (निरवांगी) येथे नीरा नदीकाठी वसलेले श्री नंदिकेश्वर मंदिर हे प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. सुमारे हजार ते अकराशे वर्षांपूर्वीचे इतिहास लाभलेले हे मंदिर हेमाडपंथी शैलीत दगडी शिळांमध्ये बांधण्यात आले असून धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते.

मंदिराबाबत प्रचलित आख्यायिकेनुसार, शिखर शिंगणापूर येथील नंदी चरण्यासाठी नीरा नदीकाठी आला असता त्याला दुखापत झाली. त्यामुळे तो याच ठिकाणी स्थिरावला. नंदी येथेच स्थानस्थ झाल्यामुळे भगवान शंभू महादेव नंदीसमोर लिंग स्वरूपात स्वयंभू प्रकट झाले आणि येथेच त्यांचे स्थायी वास्तव्य झाले. त्यामुळे या ठिकाणाला विशेष पवित्रता प्राप्त झाली आहे. स्थानिक स्तरावर हे देवस्थान “नंदुबा मंदिर” म्हणूनही ओळखले जाते.
हे मंदिर नवसाला पावणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. भाविक येथे येऊन श्री नंदिकेश्वराला साखर अर्पण करून आपल्या मनोकामना व्यक्त करतात. अनेकांच्या इच्छा पूर्ण झाल्याच्या श्रद्धेमुळे या मंदिराविषयी भक्तांमध्ये मोठा विश्वास आहे.
दरवर्षी चैत्र महिन्यात गुढीपाडव्यापासून सात दिवसांचा पारायण सप्ताह आयोजित केला जातो. या कालावधीत कीर्तन, भजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दगडवाडी, निरवांगी तसेच परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात.
याशिवाय श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी येथे भव्य यात्रा भरते. या यात्रेला लाखो भाविक उपस्थित राहून श्री नंदिकेश्वराचे दर्शन घेतात. तसेच चैत्र महिन्यात शिखर शिंगणापूरला कावड घेऊन जाणारे भाविक नंदिकेश्वराचे दर्शन घेऊनच पुढे प्रस्थान करतात. नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी भागांतील भाविकांचाही या ठिकाणी मोठा ओढा आहे.
शिखर शिंगणापूरचे दुसरे स्थान म्हणून ओळख मिळालेल्या श्री नंदिकेश्वर मंदिरामुळे परिसरातील धार्मिक वातावरण अधिक समृद्ध झाले असून भाविकांच्या श्रद्धेचे हे प्रमुख केंद्र बनले आहे.




